समस्यांबाबत व्यक्त केली ग्रामस्थांनी नाराजी
By Admin | Updated: August 18, 2014 23:39 IST2014-08-18T23:39:21+5:302014-08-18T23:39:21+5:30
शासनाच्या नियमानुसार स्थानिक ग्रा़पं़ची ग्रामसभा स्वातंत्र्यदिनी सरपंच रवींद्र बरिये यांच्या अध्यक्षतेत पार पडली़ सभेत ग्रामस्थांनी गावातील विविध समस्यांबाबत नाराजी व्यक्त केली़ यावेळी

समस्यांबाबत व्यक्त केली ग्रामस्थांनी नाराजी
रोहणा : शासनाच्या नियमानुसार स्थानिक ग्रा़पं़ची ग्रामसभा स्वातंत्र्यदिनी सरपंच रवींद्र बरिये यांच्या अध्यक्षतेत पार पडली़ सभेत ग्रामस्थांनी गावातील विविध समस्यांबाबत नाराजी व्यक्त केली़ यावेळी संरक्षण भिंतीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला़
काही ग्रा़पं़ सदस्य मासिक सभा तथा ग्रामसभेला नेहमी गैरहजर असतात़ त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, याबाबत विजय राऊत यांनी ठराव मांडला़ त्यास ग्रामसभेने मंजुरी दिली़ ग्रामविकास अधिकारी परांजपे यांनी समाज कल्याण विभागाच्या काही व्यक्तीगत लाभाच्या योजना तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून करावयाच्या कामांची माहिती दिली़ गावातील रस्त्यावर जनावरे बांधणे, रस्त्याच्या बाजूला शेण व कचऱ्याचे ढिगारे लावणे, अतिक्रमण, कोंडवाडा नसणे, रस्त्यावर भरणारा मटण व मच्छी बाजार, रेल्वे पुलाखालील रस्त्यावर पडलेला खड्डा, गांधी वॉर्डाकडील स्मशानभूमीतील असुविधा, शौचालय बांधकामातील तांत्रिक कारणे पुढे करून दिला जाणारा त्रास, पथदिवे बंद असणे, चोरांबा पांदण रस्त्याचे काम रखडल्याने होणारा त्रास याबाबत तरूणांनी सभेत चर्चा घडवून आणली़ यावेळी गावातील पाणीटंचाई, १५-१५ दिवस नळ न येणे, नळ सोडण्यातील अनियमितता, पाण्याचा गैरवापर मार्डा येथून आलेली कालबाह्य ठरलेल्या पाईपलाईनच्या तात्पुरत्या दुरूस्तीवर होणारा खर्च यावर वादळी चर्चा झाली़ पाणी समस्या निवारण्यासाठी गाव राष्ट्रीय पेय जल योजनेत समाविष्ट झाले आहे़ ही योजना गावात कार्यान्वित झाल्यास हा प्रश्न सुटेल, असा आशावाद सरपंच, उपसरपंच व सचिव यांनी व्यक्त केला़
ग्रामसभेत ग्रा़पं़ किती दिवस नळ सोडते, या हिशेबाने पाणी पट्टी कर कमी करावा, याबाबत तरूण आग्रही होते़ उपसरपंच सुनील वाघ यांनी नदी खोलीकरणाचा निधी परत गेल्याने बांधकाम विभागातील प्रशासनावर नाराजी व्यक्त केली़ नदीवरील पुलाची उंची वाढविणे, संरक्षण भिंत बांधणे यासाठी नव्याने प्रस्ताव पाठवावा लागेल, असे सांगितले़ आभार परांजपे यांनी मानले़(वार्ताहर)