ग्रामीण रुग्णालयाचे भिजत घोंगडे
By Admin | Updated: July 4, 2015 00:20 IST2015-07-04T00:20:58+5:302015-07-04T00:20:58+5:30
शासनाच्या नियोजन शून्यतेचा उत्कृष्ट नमुना म्हणून येथील नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयाकडे पाहिले जात आहे.

ग्रामीण रुग्णालयाचे भिजत घोंगडे
तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा अभाव : प्राथमिक आरोग्य केंद्रातून औषधोपचार
हरिदास ढोक देवळी
शासनाच्या नियोजन शून्यतेचा उत्कृष्ट नमुना म्हणून येथील नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयाकडे पाहिले जात आहे. रुग्णालयाचे लोकार्पण होवून तब्बल १० महिन्यांचा कालावधी होवून सुद्धा याठिकाणी तज्ज्ञ अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती न झाली नाही. जिल्हा चिकित्सक कार्यालयाकडून दोन परिचारिकांना काही तासांसाठी पाठवून यावर पांघरुन ओढले जात आहे. तात्पुरत्या स्वरुपात येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे माध्यमातून औषधोपचार होत असल्यामुळे नागरिकांत असंतोष व्यक्त होत आहे.
तालुक्याचे ठिकाण म्हणून येथील वर्धा मार्गावर साडेचार एकर परिसरात साडेतीन कोटी रूपये खर्चातून ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज ईमारतीचे बांधकाम करण्यात आले. यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वसाहतीचे बांधकाम केले. या वास्तुचे लोकार्पण आॅगस्ट २०१४ ला करण्यात आले. मात्र येथे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भरतीची तरतूद त्यावेळी आर्थिक बजेटमध्ये करण्यात आली नसल्याने येथील कारभार रामभरोसे आहे. रुग्णालयाचे उद्घाटनाआधी कर्मचारी भरती करणे आवश्यक होते. मात्र या नियमाला फाटा देण्यात आला. त्यानंतर मार्च २०१४ च्या बजेटमध्ये १४ कर्मचाऱ्यांच्या भरतीची तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये वैद्यकीय अधीक्षक, तीन तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, सात अधिपरिचारीका, एक परिचारक व दोन सेवक असा समावेश असणार होता. ३० खाटांची व्यवस्था असलेच्या या रुग्णालयासाठी ३० कर्मचाऱ्यांची तरतूद आहे. पहिल्या टप्प्यात १४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती ग्रहीत धरली तरी शासकीय स्तरावर याबाबत हालचाल दिसत नाही. यामुळे या रुग्णालयाच्या निर्मितीची शासनदरबारी नोंद आहे अथवा नाही, अशी शंका येथील नागरिक व्यक्त करतात. आजच्या स्थितीला येथे कोणतीही सुविधा नसल्यामुळे हे रुग्णालय नावापुरतेच राहिले आहे. सत्तारुढ खासदार आणि आमदार यांच्या क्षेत्रातील हे रुग्णालय असताना, या रुग्णालयाची वाताहत होत असल्याने नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. याची तातडीने दखल घेत येथे रिक्त पदे भरण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही
शहरापासून अर्धा कि़मी. अंतरावर असलेल्या या रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. यामुळे बाहेर गावावरुन आलेल्या रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी परिसरातील दुकानाचा आसरा घ्यावा लागत आहे. या परिसरात विहिर, मोटारपंप तसेच यंत्रसामग्री असताना केवळ जोडणी न केल्यामुळे मागील १० महिन्यांपासून ही गैरसोय निर्माण झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावतीने रुग्णालयाच्या वास्तूचे विद्युत बील व तीन रोजंदारी कर्मचाऱ्यांचा पगार करण्यात येत आहे. त्यामुळे या रुग्णालयाला अनुदान मिळाले की काय असा तर्क व्यक्त करण्यात येत आहे.
देवळी येथील ग्रामीण रुग्णालयासाठी अधीक्षक वर्ग-१, वैद्यकीय अधिकारी, परिचारीका व इतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचे प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आले आहे. ही पदे भरणे आमच्या हाती नसल्यामुळे याबाबतचा पाठपुरावा सुरू आहे. दोन ते तीन महिन्यांच्या आत या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची भरती अपेक्षीत आहे.
- डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा