परिसरात गावठी दारूविक्रीला उधाण
By Admin | Updated: July 27, 2014 23:54 IST2014-07-27T23:54:58+5:302014-07-27T23:54:58+5:30
वर्धमनेरी, जळगाव, भारसवाडा, सारवाडी, तळेगाव(श्या.) या पाचही गावात गावठी दारू विक्रीला उधाण आले आहे. तसेच तळेगावात गावठी दारूसह देशी-विदेशी दारूच्या बारसारखी व्यवस्था उपलब्ध आहे.

परिसरात गावठी दारूविक्रीला उधाण
तळेगाव (श्या.) : वर्धमनेरी, जळगाव, भारसवाडा, सारवाडी, तळेगाव(श्या.) या पाचही गावात गावठी दारू विक्रीला उधाण आले आहे. तसेच तळेगावात गावठी दारूसह देशी-विदेशी दारूच्या बारसारखी व्यवस्था उपलब्ध आहे. यामुळे युवापिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे. महिलांच्या छेडखानीच्या तक्रारीसुद्धा वाढायला लागल्या आहेत. त्यामुळे या दारूविके्रत्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिक करीत आहे.
काही गावात दारू मिळत नसल्याने या गावातील मद्यपी तळेगाव येथे दारू पिण्यासाठी येतात. त्यामुळे रस्त्याने जाताना शिवीगाळ, भांडणे हा दारूड्यांचा नित्यक्रमच बनला आहे. हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे या गावातील महिला एल्गार पुकारण्याच्या प्रयत्नात आहे. चोवीस तास होणाऱ्या दारू विक्रीमुळे गावातील नागरिकांना, महिलांना रोज नवीन तमाशा अनुभवास मिळतो. गावातील या दारू विक्रेत्यांना प्रशासनाचा धाकच उरला नसल्याचे दिसून येत आहे.
दारूविक्रीमुळे गावातील शांतता भंग पावत चालली आहे. महिला आणि विशेष करून युवती याबाबत तीव्र संताप व्यक्त करीत आहे. तळेगावात अवैधरित्या गावठी व देशी-विदेशी दारूचे तीन मोठे ठिय्ये आहे. त्याचप्रमाणे जळगाव येथे तीन, भारसवाडा येथे दोन तर सारवाडी येथे दारूचे दोन ठिय्ये आहेत. हे सर्व माहीत असतानाही येथील पोलीस मात्र चुप्पी साधून बसल्याचे येथील महिलांचे म्हणणे आहे.
परिसरातील अनेक गावांमध्ये राजरोसपणे दारूची विक्री सुरू असल्याने अनेकांच्या संसारांमध्ये रोजची भांडणे वाढली आहेत. तळेगावात तर दारूचा महापूर असल्याची स्थिती आहे. गावातील अवैधधंदे बंद न झाल्यास तसेच अशीच दारूविक्री सुरू राहिली तर पोलीस ठाण्यासमोर दारू विकण्याचा धंदा करू असा विचार काही महिलांनी बोलून दाखविला. त्यामुळे तळेगावसह इतर गावात होत असलेली दारूविक्री थांबवावी अशी मागणी केली जात आहे.(वार्ताहर)