भाजी नव्हेच...असुविधांचा बाजार

By Admin | Updated: August 2, 2015 02:40 IST2015-08-02T02:40:58+5:302015-08-02T02:40:58+5:30

शहरातील मुख्य भाजीबाजार सध्या असुविधांचा बाजार म्हणूनच समोर येत आहे. जागेचा तिढा, विकास आराखडा तयार असतानाही लिजची वाढत

Vegetable is not ... inauspicious market | भाजी नव्हेच...असुविधांचा बाजार

भाजी नव्हेच...असुविधांचा बाजार

वर्धा : शहरातील मुख्य भाजीबाजार सध्या असुविधांचा बाजार म्हणूनच समोर येत आहे. जागेचा तिढा, विकास आराखडा तयार असतानाही लिजची वाढत नसलेली मुदत, सुविधा देणारा आणि कर वसूल करणारा या दोन विभागातील तफावत या संपूर्ण प्रकारामुळे असुविधाच वाढताना दिसतात. याचा त्रास केवळ भाजी विक्रेत्यांनाच होतो असे नव्हे तर संपूर्ण शहरातील ग्राहकांना हा त्रास सहन करावा लागतो. कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर परिषद आणि जिल्हा प्रशासनही याकडे लक्ष देत नसल्याने भाजी बाजाराचा प्रश्न सोडवणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील मुख्य भाजी बाजार बजाज चौकाच्या शेजारी भरविला जातो. शेतकऱ्यांशी निगडीत बाब म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने सदर जागा बाजारासाठी देण्यात आली. गत कित्येक वर्षांपासून या जागेवर बाजार भरविला जातो. जागा कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेली असली तरी त्या बाजाराचा कर मात्र नगर परिषद प्रशासनाद्वारे वसूल केला जातो. यामुळे अद्यापही या बाजाराचा विकास आणि विस्तार होऊ शकलेला नाही. बाजाराला कुठल्याही सुविधा पुरविता आलेल्या नाहीत. अद्याप वर्धा शहरातील बाजारात ओट्यांचीही सोय नाही, हे आश्चर्यच म्हणावे लागेल. शेतीशी निगडीत बाब असल्याने शेतकऱ्यांना आपले भाजीपाला वर्गीय उत्पादन विकता यावे, त्यासाठी भटकावे लागू नये म्हणून बाजार समितीने ही जागा बाजाराला दिली. शेतकरी आपला माल तेथे विकू लागले; पण अद्याप बाजाराचा विकास होऊ शकला नाही. पावसाळ्यात बाजारामध्ये सर्वत्र चिखलाचे साम्राज्य असते. ग्राहकांना फिरण्याकरिता व्यवस्थित जागा नाही. भाजी घेऊन येणाऱ्या वाहनांना बाजारात माल उतरवताना तारेवरची कसरत करावी लागते. एखादे वाहन रस्त्यावर अडकले तर वाहतुकीचा पचका होतो. शिवाय बाजारातही दुकानदार व ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. वाहने उभी करण्याकरिता कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. भाजी विक्रेत्यांना बसण्याकरिता पुरेशी जागा नाही. मोठी जागा रिक्त असून तेथे केवळ कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येते. शिवाय गुरांचा मुक्त संचार आणि व्यवस्थेच्या अभावामुळे त्रास सहन करावा लागतो. बाजार म्हटला की, भाजीपाला या दुकानातून त्या दुकानात, एका व्यापाऱ्याकडून दुसऱ्या व्यापाऱ्याकडे नेला जातो. शिवाय अनेक किरकोळ भाजी विक्रेतेही या मुख्य बाजारात भाजी घेण्यासाठी येतात. ही संपूर्ण व्यवस्था सुरळीत करण्याकरिता प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Vegetable is not ... inauspicious market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.