१८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना व्हॅक्सिन देण्याचा पाच केंद्रांवरून झाला श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 05:00 IST2021-05-03T05:00:00+5:302021-05-03T05:00:16+5:30
४५ पेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून कोविडची लस दिली जात आहे; पण १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना ही लस नि:शुल्क की नाममात्र शुल्क आकारून द्यायची, याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारांना केंद्र सरकारने दिले आहेत. १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येक लाभार्थ्याला राज्य सरकार नि:शुल्क लस देणार असून, केंद्राकडून खरेदी केलेल्या ३ लाख लसीच्या डोजपैकी ५ हजार डोज वर्धा जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत.

१८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना व्हॅक्सिन देण्याचा पाच केंद्रांवरून झाला श्रीगणेशा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची मोहीम रविवारी जिल्ह्यातील पाच केंद्रांवरून सुरू झाली असून, या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनाच व्हॅक्सिन दिली जात आहे. या पाचही लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी एक हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत.
४५ पेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून कोविडची लस दिली जात आहे; पण १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना ही लस नि:शुल्क की नाममात्र शुल्क आकारून द्यायची, याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारांना केंद्र सरकारने दिले आहेत. १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येक लाभार्थ्याला राज्य सरकार नि:शुल्क लस देणार असून, केंद्राकडून खरेदी केलेल्या ३ लाख लसीच्या डोजपैकी ५ हजार डोज वर्धा जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. हीच व्हॅक्सिन १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवत जिल्ह्यातील पाच केंद्रांवरून रविवारी प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. या पाचही केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून अपॉइंटमेंट घेऊन आलेल्या लाभार्थ्याला कोविडची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे.
प्रत्येक दिवशी शंभर लाभार्थ्यांना प्रतिबंधात्मक लस देण्याचे उद्दिष्ट
रविवारपासून सुरू झालेल्या या लसीकरण केंद्रांवरून प्रत्येक दिवशी १८ ते ४४ वयोगटातील शंभर लाभार्थ्यांना कोविडची लस देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मुबलक लससाठा उपलब्ध होताच लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
१८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून नियोजित वेळेत लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे. नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनाच कोविडची लस दिली जात आहे.
-डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.