ग्रामीण भागात अघोषित संचारबंदी
By Admin | Updated: January 24, 2016 02:06 IST2016-01-24T02:06:04+5:302016-01-24T02:06:04+5:30
डिसेंबर महिन्याच्या शेवटी काहीसा गारठा सोडला तर या वर्षी थंडीचा विशेष कहर जाणवला नाही.

ग्रामीण भागात अघोषित संचारबंदी
थंडीची लाट : शेतीची कामे प्रभावित, सकाळच्या शाळांना विद्यार्थ्यांची दांडी
वर्धा : डिसेंबर महिन्याच्या शेवटी काहीसा गारठा सोडला तर या वर्षी थंडीचा विशेष कहर जाणवला नाही. संक्रांत सरल्याने अता थंडी कमी होईल असा अंदाज असतानाच जानेवारी महिन्याअखेर २२ जानेवारीपासून पारा घसरायला सुरुवात झाली. त्यामुळे दोन दिवसांपासून दिवसभर गारठा कायम आहे. सायंकाळी ६ वाजेपासून शहरासह जिल्हा गारठायला सुरुवात होत. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते अघोषित संचारबंदीसारखे सायंकाळनंतर निर्मनुष्य होत आहेत.
वाढत्या गारठ्यामुळे सामान्य माणूस आपली बाजाराची कामे लवकर आटोपून अंधार पडण्याआधीच घराचा रस्ता धरत आहे. रात्री ९ वाजेपर्यंत उघडी राहणारी उपहारगृह, पानठेले, चहाटपरी सायंकाळपासूनच ग्राहकाअभावी ओस पडू लागले असून गारठयाचा व्यापारावरही परिणाम होत आहे. दोन दिवसापासून जिल्ह्याचे रात्रीचे तापमान ८ ते ९ अंशाच्या आसपास आहे. हीच स्थिती राहिल्यास पारा आणखी घसरण्याची शक्यताहे व्यक्त होत आहे. दिवसभराची रोजमजुरी करून सायंकाळी घरी परतल्यानंतर ग्रामस्थ गावातील पारावर शेकोटी लावून गुलाबी थंडीचा आनंद घेत आहे. रात्री होणारी शेतातील जागली गरम घोंगडे, हातात काठी, डोक्याला मुंडासे व मचाणाजवळ शेकोटी अशा स्थितीत होत आहे. शहरी भागातील नागरिक मात्र दिवसभराची कामे आटोपून सायंकाळनंतर गरम स्वेटर्स, शाल, मफलर, ऊनी टोपी घालून घरात राहाणे पसंद करीत आहे. वांग्याचे खमंग भरीत, ज्वारीच्या गरम भाकरी, दाळ-तांदळाची खिचडी सोबतच वांग्याची मसालेदार भाजी आणि पानगे असा बेत करून थंडीचा आनंद घेतला जात आहे. असे वातावरण रबी पिकांसाठी पोषक असल्याने बळीराजा सुखावला आहे. थंडीची लाट असून काही दिवस कायम राहणार असा अंदाज वर्तविला जात आहे.(शहर प्रतिनिधी)
रात्रीच्या कार्यक्रमांमध्ये शेकोट्या लावण्याची क्रेझ
तीन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आहे. त्यामुळे सर्वत्र हुडहुडी भरू लागली आहे. शेकोट्या पेटू लागल्या. गारठ्यामुळे रात्रीच्या लग्नाचे, प्रीतिभोजनाचे कार्यक्रम यावर थंडीचा परिणाम होत आहे. रात्री ८ पर्यंत सर्वत्र सामसूम होऊन बाजारपेठही लवकरच बंद होत आहे.
दुपारी ४ वाजतापासूनच गारठ्याला सुरुवात होते. रात्री घराबाहेर निघण्याची इच्छा होत नाही. गावखेड्यात शेकोट्या पेटू लागल्या तर रात्रीच्या मंगलकार्यातही भोजनाच्या वेळी शेकोट्या पेटविल्या जात आहे. वातावरणातील गारठा प्रकृती स्वास्थावरही चांगला असला तरी लहान मुलांच्या प्रकृतीवर याचा परिणाम होत आहे. सेलू तालुक्यात सिंचनाचे प्रमाण इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे रात्रीचा गारवा अंगाला जास्त झोंबतो. त्यामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णातही वाढ झाली आहे.
गावे गारठली, जागोजागी पेटल्या शेकोट्या
सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. ग्रामीण भागात थंडीचा जोर अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण जीवन गारठले असून दिवसासुद्धा जागोजागी शेकोट्या नजरेस पडत आहे. सायंकाळी ७ नंतर अघोषित संचारबंदीसदृष्य स्थिती पहावयास मिळत आहे.
थंडी ही रबी पिकांसाठी पोषक असली तरी सकाळची शेतीची कामे प्रभावित झाली आहे. पवनार, सेलू, हिंगणघाट, पुलगाव, खरांगणा आदी गावे ही नद्यांलगत असल्याने या भागात थंडीचा जोर अधिक आहे. संपूर्ण दिवसभर झोंबणारी थंडी, बोचरे वारे यामुळे गारठा आणखी जाणवत आहे.
सायंकाळी ७ वाजले की गावांतील रस्त्याने कुणीही फिरकताना दिसत नाही. दारे-खिडक्या बंद करून कोंडून घेण्याची वेळ आली आल्याची भावना म्हातारी मंडळी व्यक्त करीत आहे.
कुडकुडणाऱ्या थंडीत शिक्षक वेळेवर येत असले तरी विद्यार्थी शाळेत येण्याचा कंटाळा करीत आहेत
गहू, चना या पिकांसाठी थंडी आवश्यक असली तरी सकाळी ओलित करताना शेतकऱ्यांचे व मजुरांचे हात कापू लागले आहे. त्यामुळे शेतातही पहाटे पहाटे शेकोट्या पेटायला सुरूवात झाली आहे.