अनियंत्रित मालवाहूची कारला जबर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 05:00 IST2022-05-08T05:00:00+5:302022-05-08T05:00:51+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील नांदोरा येथील फिरके कुटुंबीय कारने (क्र. एमएच ३२ एजे २४४२) गडचिरोली येथे सासऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी जात होते. दरम्यान शेडगाव आणि वाघाडी नदीजवळ चंद्रपूरकडून वर्ध्याकडे भरधाव जाणाऱ्या मालवाहू गाडीच्या (क्र. एमएच २८ एझेड ५९९४) चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन कारवर जाऊन धडकले.

अनियंत्रित मालवाहूची कारला जबर धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : चंद्रपूरकडून वर्ध्याकडे भरधाव येणारा मालवाहू अचानक अनियंत्रित झाल्याने वर्ध्याकडून समुद्रपूरकडे जाणाऱ्या कारला धडकला. या भीषण अपघातात कारमधील चार जण आणि एका महिन्याचे बाळ तसेच मालवाहूमधील २ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात वाघाडी नदीजवळ शनिवारी ७ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झाला. सर्व जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील नांदोरा येथील फिरके कुटुंबीय कारने (क्र. एमएच ३२ एजे २४४२) गडचिरोली येथे सासऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी जात होते. दरम्यान शेडगाव आणि वाघाडी नदीजवळ चंद्रपूरकडून वर्ध्याकडे भरधाव जाणाऱ्या मालवाहू गाडीच्या (क्र. एमएच २८ एझेड ५९९४) चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन कारवर जाऊन धडकले. या भीषण अपघातात कारमधील प्रवीण गजानन फिरके (३२), सुभद्रा प्रवीण फिरके (२५), शालिनी गजानन फिरके (५५), संध्या प्रदीप नाकडे (५५) आणि अवघ्या वर्षभराचे बाळ (सर्व रा. नांदोरा, जि. बुलडाणा) हे जखमी झाले. तसेच मालवाहूमधील राकेश राजू उईके (३०) व अमोल कुदमवार (२७) हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच समुद्रपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राम खोत, मनोज कोसूरकर, आलोक हनवते, इस्माईल शाह, गृहरक्षक दलाचे प्रतीक ठोंबरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. मेघश्याम ढाकरे, नगरसेवक विक्की बारेकर, आधार फाउंडेशनचे दिनेश जाधव यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले असता प्रकृती नाजूक असल्याने फिरके कुटुंबीयांना नागपूर तर मालवाहूतील जखमींना सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविले आहे.