वीज कोसळल्याने झाड पडून दुचाकीस्वार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 14:44 IST2021-02-17T14:44:23+5:302021-02-17T14:44:42+5:30
Wardha News जोरात कडाडलेली वीज बाभळीच्या झाडावर पडून ते झाड कोसळताना रस्त्यावरून जाणारी दुचाकी नेमकी त्याचवेळी झाडाखाली आल्याने दोनजण जखमी झाल्याची घटना आष्टी तालुक्यात घडली.

वीज कोसळल्याने झाड पडून दुचाकीस्वार जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: जोरात कडाडलेली वीज बाभळीच्या झाडावर पडून ते झाड कोसळताना रस्त्यावरून जाणारी दुचाकी नेमकी त्याचवेळी झाडाखाली आल्याने दोनजण जखमी झाल्याची घटना आष्टी तालुक्यात घडली.
तालुक्यातील भारसवाडा खडकीदरम्यान मुंजेबा मंदीर नजीक बुधवारी सकाळी ११ वाजताचे दरम्यान ही घटना घडली. जखमीमध्ये मुरलीधर मुंदाने, रा. तळेगांव व पुरुषोत्तम बाळस्कर रा. ममदापुर असे दोघे आहेत.
प्राप्त माहितीनुसार मुरलीधर मु्दाने यांचे अंतोरा येथे वेल्डींगचे दुकान आहे. ते त्यांचा सहकारी पुरुषोत्तम बाळस्कर यांचे सह तळेगाववरुन अंतोरा येथे दुकानात कामावर जात होते. दरम्यान विजेचा कडकडाट सुरु असताना जोरात कडाडलेली विज भारसवाडा खडकीदरम्यान मुंजेबा मंदीर नजीकच्या रोडच्या बाभळीच्या झाडावर पडली. ते झाड कोसळले त्याच क्षणी हे दोघे त्या झाडाखाली आले असता दुचाकीसह त्यामध्ये दबले. त्यात मुरलीधर मुंदाने हे किरकोळ जखमी झाले असुन पुरुषोत्तम बाळस्कर यांचे दोन्ही पाय मोडल्याचे समजले. ही घटना खडकी येथील सुरेंद्र नागपुरे यांना दिसली त्यांनी लगेच गावात जाऊन सहकाऱ्यांना सोबत घेऊन झाडाखाली दबलेल्या जखमींना बाहेर काढुन उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे रवाना केले.