वर्ध्यात २९ हजारांच्या ‘एमडी ड्रग्ज’सह दोन तस्कर जेरबंद
By चैतन्य जोशी | Updated: March 4, 2023 18:47 IST2023-03-04T18:46:12+5:302023-03-04T18:47:29+5:30
क्राईम इंटेलिजन्स पथकाची कारवाई : १.१३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

वर्ध्यात २९ हजारांच्या ‘एमडी ड्रग्ज’सह दोन तस्कर जेरबंद
वर्धा : वर्ध्यात २८ हजार ९५० रुपये किंमतीचा ९.२० ग्रॅम एमडी ड्रग्जसह दोन तस्करांना पोलिसांनी अटक केली. ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करणारी ही वर्ध्यात पहिली मोठी कारवाई असून पोलिसांनी दुचाकीसह मोबाईल असा एकूण १ लाख १३ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई क्राईम इंटेलिजन्स पथकाने आनंदनगर परिसरात ३ रोजी रात्रीच्या सुमारास केली. सुफीयान कैसरोद्दीन शेख (२२) रा. इतवारा बाजार, मुन्ना उर्फ राजन थूल रा. आनंदनगर अशी अटक केलेल्या तस्करांची नावे आहे.
आनंदनगर परिसरात एक व्यक्ती दुचाकीने एमडी ड्रग्ज या अंमली पदार्थाची डिलिव्हरी करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आनंदनगर परिसरात जात पाहणी केली असता एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. तो एका दुचाकीवर बसून होता. पोलिसांनी त्यास ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सुफीयान शेख असे नाव सांगितले. त्याच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात प्लास्टिकच्या पारदर्शक पाकिटात उग्र वास येणारी पांढऱ्या रंगाची पावडर मिळून आली. पोलिसांनी याप्रकरणात दोघांना अटक करुन ९.२० ग्रॅम एमडी ड्रग्ज, तीन मोबाईल, एक दुचाकी असा एकूण १ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, रोशन निंबाेळकर, सागर भोसले, मिथून जिचकार, अरविंद इंगोले, मंगेश आदे, पवन देशमुख, राकेश इतवारे, धिरज राठोड, अभिषेक नाईक, हर्षल सोनटक्के, शिरीन शेख, प्रफुल्ल वानखेडे यांनी केली.
‘मुन्ना’चालवायचा रॅकेट...
क्राईम इंटेलिजन्स पथकाने ड्रग्ज विक्री करणारा सुफीयान याला अटक करुन पोलिसी खाक्या दाखविताच त्याने एमडी ड्रग्ज आनंदनगर येथील रहिवासी मुन्ना उर्फ राजन थुल याच्याकडून आणल्याचे त्याने सांगितले. मुन्ना हा घरातुनच एमडी ड्रग्ज विक्रीचा गोरखधंदा चालवित होता. पोलिसांनी त्याच्या घरी छापा मारुन १४ प्लास्टिक पाकिटं जप्त करुन ड्रग्ज विक्रीचा पर्दाफाश केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"