अत्याचाराच्या दोन घटनांनी समाजमन सुन्न
By Admin | Updated: May 25, 2017 00:58 IST2017-05-25T00:58:57+5:302017-05-25T00:58:57+5:30
भारसवाडा येथील अल्पवयीन मुलीवर एका युवकाने अत्याचार केला तर शिकवणीमध्ये येणाऱ्या विद्यार्थिनीचे खुद्द शिक्षकानेच दोन वर्षे लैंगिक शोषण केले.

अत्याचाराच्या दोन घटनांनी समाजमन सुन्न
तालुक्यात खळबळ : विद्यार्थिनीचे शोषणप्रकरणी शिक्षकाला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (श.) : भारसवाडा येथील अल्पवयीन मुलीवर एका युवकाने अत्याचार केला तर शिकवणीमध्ये येणाऱ्या विद्यार्थिनीचे खुद्द शिक्षकानेच दोन वर्षे लैंगिक शोषण केले. बलात्काराच्या या दोन्ही घटनांबाबत बुधवारी तक्रारी झाल्याने तालुक्यात खळबळ माजली. या अत्याचाराच्या घटनांमुळे समाजमन सुन्न झाले.
शहरातील मध्यवस्तीत शिवस्मृती कोचिंग क्लासेस चालविणाऱ्या शिक्षकाने एका विद्यार्थिनीचे दोन वर्षांपासून लैंगिक शोषण केले. याप्रकरणी बुधवारी पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शिक्षक शरद बबुलकर (४२) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील पिडीत विद्यार्थिनींची संख्या वाढणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिलेत.
पोलीस सुत्रानुसार, शरद बबुलकर याने प्रभाग क्र. ५ मध्ये पाठे यांच्या घरी भाड्याने खोली घेत शिकवणी वर्ग सुरू केले. या ठिकाणी दोन वर्षांपासून बारावीमधील एका विद्यार्थिनीवर सतत अत्याचार करून लैंगिक शोषण करण्याचे काम नराधम शिक्षकाने केले. इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यावर अकरावी व बारावी या दोन्ही वर्षात सदर विद्यार्थिनीचे विविध आमिषे देत शोषण केले. हे कृत्य करताना शिकवणी खोलीच्या बाहेर एक मित्र उभा करून ठेवत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्रास असह्य झाल्याने बुधवारी पिडीतेने ठाणेदाराकडे तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी आरोपी शरद बबुलकर याच्यावर भादंविच्या कलम ३७६, (२) एफ.एन. ५०६, ११४ सतत लैंगिक शोषण, जीवे मारण्याची धमकी अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून सखोल माहिती तपासादरम्यान घेणे सुरू आहे. प्रकरणाचार पूढील तपास ठाणेदार दिलीप ठाकूर करीत आहेत.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार
भारसवाडा येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आष्टी येथे रूम करून शिकायला आहे. आरोपीने तेथे जाऊन तुझ्या वडिलांची प्रकृती खराब आहे, असे सांगत भेटायला चल म्हणून सोबत घेऊन जात जंगलात जबरी बलात्कार केला. याबाबत मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशांत काळे (३२) रा. भारसवाडा, असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस सुत्रानुसार, अल्पवयीन पिडीता आजीसोबत आष्टी येथे शिक्षणासाठी रूम करून राहते. सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास प्रशांत काळे हा भारसवाडा येथून आष्टीला आला. रूमवर जाऊन तुझ्या वडिलांची तब्बेत ठिक नाही, असे सांगितले. भेटासाठी घेऊन यायला सांगितल्याचे म्हणत दुचाकीवर बसवून वरूड रोडने जंगलात नेले. रस्ता चुकला म्हणून तरूणीने हटकले असता आरोपीने दमदाटी केली. यानंतर जंगलात गाडी नेऊन मुलीवर जबरीने अत्याचार केला. नंतर तिला रूमवर आणून सोडले. घाबरलेल्या मुलीने रूमवर येताच सर्व प्रकार आजीला सांगितला.
याबाबतच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३७६, सहकलम ४ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा दाखल केला. फरार आरोपीच्या अटकेसाठी पथक पाठविले आहे.