सैनिकांना पाठविल्या अडीच हजार राख्या
By Admin | Updated: August 27, 2015 02:19 IST2015-08-27T02:19:19+5:302015-08-27T02:19:19+5:30
स्थानिक प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधनाच्या पर्वावर गत २० वर्षापासून राख्या पाठविण्यात येतात.

सैनिकांना पाठविल्या अडीच हजार राख्या
२० वर्षांची परंपरा : रोव्हर्स, रेंजर्स, एन.सी.सी. छात्र सैनिकांचा उपक्रम
वर्धा : स्थानिक प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधनाच्या पर्वावर गत २० वर्षापासून राख्या पाठविण्यात येतात. याच उपक्रमात रोव्हर पथक, राणी लक्ष्मीबाई रेंजर युनिट व एन.सी.सी. छात्रसैनिकांनी सहभाग दर्शवित या वर्षीही अडीच हजार राख्या तयार करून पाठविण्यात आल्या.
सीमेवर रक्षण करीत असलेल्या सैनिकांप्रती या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. देवळी येथील एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील नेताजी सुभाषचंद्र बोस रोव्हर पथक, प्रहार संस्थेतर्फे आर्मी युनिट्सकडे राख्या सुपूर्द केल्या. या राख्या चीन सीमा, भारत-पाक सीमा व भारत-तिबेट सीमेवर असलेल्या आर्मी युनिट्सना रवाना करण्यात आल्या आहेत.
राख्या पाठविण्याचा कृतज्ञता कार्यक्रम देवळी येथे स्कॉऊट भवनात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोव्हर लिडर लेफ्टनंट प्रा. मोहन गुजरकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक दीपक साखरे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक साखरे म्हणाले, देशाच्या सीमेवरील सैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले कर्तव्य बजावित असतात. कर्तव्यापूढे सण, उत्सव व वैयक्तिक कार्यक्रमांना ते दुय्यम स्थान देतात. देशाला सैनिकांसारखीच मानसिकता असलेल्या तरूणांची नितांत गरज आहे. या उपक्रमात अत्यंत प्रशंसनीय असून त्यात सहभागी रोव्हर्स, रेंजर्स व एन.सी.सी. छात्र सैनिकांची कृतज्ञता खरच इतरांना प्रेरणादायी आहे, असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी सार्जेट उमा मसराम, स्मिता सुरजूसे, दिनेश रामगडे, रेंजर कंपनी सार्जेट मेजर सुरज पोटफोडे, वैभव भोयर, आशिष परचाके, साकिब पठाण यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक लेफ्टनंट प्रा. गुजरकर यांनी केले. संचालन सहाय्यक रेंजर लिडर अश्विनी घोडखांदे हिने केले तर आभार अंडर आॅफिसर रवी बकाले यांनी मानले.(स्थानिक प्रतिनिधी)