आठवड्यातील दोन दिवस गटसचिव राहणार सेलूत
By Admin | Updated: May 27, 2014 23:54 IST2014-05-27T23:54:19+5:302014-05-27T23:54:19+5:30
तालुक्यातील ४२ सहकारी संस्था अंतर्गत येणार्या शेतकर्यांची सहकारी सोसायटीचे कर्ज नसल्याच्या दाखल्यासाठी संस्थेचे गटसचिव मिळत नसल्याने उन्हातान्हात पायपीट सुरू होती. त्यामुळे कर्ज

आठवड्यातील दोन दिवस गटसचिव राहणार सेलूत
सेलू : तालुक्यातील ४२ सहकारी संस्था अंतर्गत येणार्या शेतकर्यांची सहकारी सोसायटीचे कर्ज नसल्याच्या दाखल्यासाठी संस्थेचे गटसचिव मिळत नसल्याने उन्हातान्हात पायपीट सुरू होती. त्यामुळे कर्ज नसल्याचा दाखला घेण्यासाठी शेतकर्यांची ससेहोलपट होत होती. याबाबत ‘लोकमत’ने २६ मे रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. त्याची गंभीर दखल घेत जिल्हा देखरेख सहकारी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत तलमले यांनी सर्व गटसचिवांना दर मंगळवार व शुक्रवारी सेलू येथे एकाच ठिकाणी बसून शेतकर्यांना नाहरकत प्रमाणपत्र व त्यांची इतर कामे अडवणूक न करता करण्याचा आदेश दिला आहे. ‘लोकमत’ने त्रस्त शेतकर्यांच्या अडचणीला वाचा फोडली. जिल्हा देखरेख सहकारी संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जयंत तलमले यांनी आदेश काढून सर्व गटसचिवांनी सेलूचा आठवडी बाजार असलेल्या मंगळवार व शुक्रवारलाही सेलूत एकाच ठिकाणी सर्व गटसचिवांनी बसून शेतकर्यांच्या अडचणी दूर करण्याचा आदेश दिला आहे. आता शेतकर्यांना प्रमाणपत्रासाठी गटसचिवाचा शोध घेत भटकण्याची वेळ येणार नाही. शेतकर्यांना वेळीच जर नाहरकत प्रमाणपत्र मिळाले तर त्याला कर्ज घेणे सोपे होईल. (तालुका प्रतिनिधी) शेतकर्यांना सहकारी सोसायटीचे कर्ज नसल्याचे प्रमाणपत्र मिळाले की ते बघून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपले प्रमाणपत्र देते. सहकारी सोसायटीचे गटसचिव पगार नियमीत होत नसल्याने व सहकारी बँक अवसायनात निघाल्याने हतबल झाले व त्यांचे कामात लक्ष लागत नाही. त्यामुळे ठरलेल्या दिवशी मुख्यालयी हजर मिळत नव्हते. शेतकर्यांना हंगामाच्या तोंडावर सहकारी बँक डुबल्याने राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेणे क्रमप्राप्त ठरत आहे. यासाठी सहकारी संस्थेचा कर्ज नसल्याचा दाखला अत्यावश्यक आहे. त्या दाखाल्यासाठी गटसचिवाच्या शोधात शेतकरी फिरत होते; मात्र त्यांचा पत्ता लागत नव्हता.