साडेतीन लाखांवर दारूसाठा जप्त
By Admin | Updated: June 21, 2014 01:56 IST2014-06-21T01:56:10+5:302014-06-21T01:56:10+5:30
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे गुरूवारी पहाटे एकुर्ला फाटा अल्लीपूर ...

साडेतीन लाखांवर दारूसाठा जप्त
वर्धा : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे गुरूवारी पहाटे एकुर्ला फाटा अल्लीपूर येथे नाकाबंदी केली़ यात ३ लाख ५९ हजार रुपयांचा दारूसाठा व कार जप्त करण्यात आली़ या प्रकरणी एकास अटक करण्यात आली.
चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आणला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली़ एकुर्ला फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान, एम़एच़ ४९ डी़ १३१९ क्रमांकाची कार अडविण्याचा प्रयत्न केला; पण ही कार भरधाव पूढे निघाल्याने पोलिसांनी पाठलाग केला. काही अंतरावर कार अडविण्यात पोलिसांना यश आले. या कारची झडती घेतली असता डिप्लोमॅट कंपनीच्या ९० एमएलच्या २ हजार ४८० शिशा किंमत २ लाख ४८ हजार रुपये, डिप्लोमॅट कंपनीच्या १८० एमएलच्या ४६ शिशा किंमत ९० हजार रुपये, बियरच्या ९६ शिशा किंमत १९ हजार २०० रुपये असा मोठा दारूसाठा आढळून आला. दारूची वाहतूक करण्यात आलेली कार किंमत ६ लाख रुपये जप्त करण्यात आली. कार चालक प्रशांत तानबाजी चंदनखेडे (२९) रा. अल्लीपूर यास ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी अल्लीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आरोपीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले़
जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक टी. गेडाम यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एम.टी. चाटे, सहायक पोलीस निरीक्षक विजय नाईक, संजय गायकवाड, मनोज नांदुरकर, किशोर आप्तुरकर, अजय रिठे, आत्माराम भोयर यांनी ही कारवाई पार पाडली़(कार्यालय प्रतिनिधी)