गौण खनिजाची अवैध वाहतूक प्रकरणी ट्रक जप्त
By Admin | Updated: December 13, 2014 02:04 IST2014-12-13T02:04:53+5:302014-12-13T02:04:53+5:30
तळेगाव परिसरातील काही शिवारात गत अनेक महिन्यांपासून मुरूमाचे मोठ्या प्रमाणात जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम केले जात आहे.

गौण खनिजाची अवैध वाहतूक प्रकरणी ट्रक जप्त
तळेगाव (श्यामजीपंत): तळेगाव परिसरातील काही शिवारात गत अनेक महिन्यांपासून मुरूमाचे मोठ्या प्रमाणात जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम केले जात आहे. यावर ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. वृत्तातून अवैध गौण खनिजाची माहिती मिळताच जाग आलेल्या महसूल विभागाने शुक्रवारी परिसरात धाडसत्र अवलंबिले. यात रामदरा परिसरातून कुठलीही परवानगी नसताना मुरूम नेताना एक ट्रक जप्त करण्यात आला. ही कारवाई दुपारी १ वाजता तहसीलदार स्मिता पाटील यांनी केली.
रामदरा गिट्टीखदान टेकडी परिसरात खोदकाम करून मुरूम अवैधरित्या नेण्यात येत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. यावरून विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत एम.एच.२७ एक्स ६१४६ हा ट्रक जप्त केला. यात ज्ञानेश्वर तायडे व त्यांचा सहकारी विकास ठाकरे हा ट्रकमध्ये तीन ब्रास मुरूम नेत होता. चौकशी केली असता त्यांच्याकडे या वाहतुकीची कुठलीही परवानगी नव्हती. सदर ट्रक ताब्यात घेवून तळेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. प्रकरणाचा तपास सुरू आहे.(वार्ताहर)