पोखरलेली झाडे ठरताहेत धोकादायक
By Admin | Updated: May 19, 2014 23:48 IST2014-05-19T23:48:10+5:302014-05-19T23:48:10+5:30
रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह जिल्हा परिषद बांधकाम विभागाद्वारे रस्त्यांची निर्मिती केली जाते़ हे करीत असतानाच रस्त्याच्या कडेला

पोखरलेली झाडे ठरताहेत धोकादायक
वर्धा : रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह जिल्हा परिषद बांधकाम विभागाद्वारे रस्त्यांची निर्मिती केली जाते़ हे करीत असतानाच रस्त्याच्या कडेला वृक्षांचे रोपण केले जाते़ अशीच अनेक झाडे जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला आढळतात़ यातील बहुतांश झाडे पोखरलेलीही आहेत; पण त्याकडे अद्याप कुणाचे लक्ष गेल्याचे दिसत नाही़ यात वर्धा ते नागपूर, वर्धा ते वायगाव, वर्धा ते आर्वी या मार्गांचा समावेश आहे़ काही जुन्या झाडांचे बुड पूर्णत: पोखरले गेल्याने ती झाडे कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे़ संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़ वर्धा ते हिंगणघाट या मार्गावर कित्येक वर्षांपूर्वी लावण्यात आलेली मोठी कडुनिंब तसेच अन्य प्रजातीची झाडे आहेत़ रस्त्याच्या रूंदीकरण कामात यातील अनेक झाडे कापण्यात आलीत़ असे असले तरी अनेक जुनी झाडे रस्त्याच्या कडेला डौलात उभी आहेत़ ही झाडे सुस्थितीत ठेवण्याकरिता संबंधित प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असते; पण तसे होताना दिसत नाही़ वाढलेल्या झाडांकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नसल्याचेच सध्या दिसून येत आहे़ वर्धा ते वायगाव आणि नागपूर मार्गावरील अनेक जुन्या झाडांचे बुड पोखरलेले आढळून येते़ काही झाडांच्या ढोल्यामध्ये आगी लावण्यात आल्या आहेत़ यामुळे ही झाडे रस्त्यावर झुकली असून धोक्याची ठरत आहेत़ आर्वी मार्गावरही अनेक जुनी झाडे आहेत़ या वृक्षांच्या देखभालीकडे कुणाचेही लक्ष नसल्याने ते रस्त्यावर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे़ काही कंत्राटदार जाणिवपूर्वक झाडाच्या बुडाला आगी लावून ते पाडण्याचाही प्रयत्न करतात़ ही पडलेली झाडे विकण्याचा सपाटाही अनेक लाकुडचोर लावत असल्याचे दिसून येत आहे़ संबंधित विभागाने जुन्या झालेल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची देखभाल करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे़(कार्यालय प्रतिनिधी)