घाटांच्या लिलावाअभावी ट्रॅक्टर व्यवसाय अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:44 IST2017-07-23T00:44:18+5:302017-07-23T00:44:18+5:30
तालुक्यातील रेतीघाटांचा तसेच इतर गौण खनिजांचा लिलाव करण्यात आला नाही.

घाटांच्या लिलावाअभावी ट्रॅक्टर व्यवसाय अडचणीत
तहसीलदारांना निवेदन : ग्राहक पंचायत शाखेने व्यक्त केली चिंता
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : तालुक्यातील रेतीघाटांचा तसेच इतर गौण खनिजांचा लिलाव करण्यात आला नाही. परिणामी, यावर अवलंबून असलेले व्यावसायिक अडचणीत आले आहेत. यामुळे रेतीघाट तथा गौण खनिजांचे लिलाव करून परिसरातील घर बांधकामांना गती देण्यासह यावर अवलंबून असलेल्या रोजगाराला चालना द्यावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत ग्राहक पंचायत शाखेद्वारे तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील बहुतांश रेतीघाटांचे लिलाव झाले नाही. यामुळे यावर आधारित असलेला ट्रॅक्टरचा व्यवसाय अडचणीत आला आहे. एकट्या देवळी शहरात ९७ ट्रॅक्टर असून तालुक्यातील ६३ ग्रामपंचायती मिळून या वाहनांचा आकडा मोठा आहे. यावर मजुरीची कामे करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. बहुतेक ट्रॅक्टर व्यवसायी सुशिक्षित बेरोजगार आहेत. लग्नापूर्वी कामधंद्याची विचारणा होत असल्याने बहुतांश सुशिक्षित बेरोजगारांनी बँकेचे कर्ज घेऊन ट्रॅक्टरचा व्यवसाय थाटल्याचे दिसून येते; पण रेती घाटांचा लिलाव होत नसल्याने त्यांच्या ट्रॅक्टरची चाके फिरणे बंद झाली आहेत. यातील बहुतांश व्यावसायिक नवविवाहीत असल्याने त्यांचा संसार अडचणीत आला आहे. रेती उपलब्ध होत नसल्याने घरांची बांधकामे ओस पडली आहेत. शासकीय कामेही अडचणीत आली आहेत. अधिकचे पैसे मोजून अवैध मार्गाने आणलेली रेती घ्यावी लागत आहे. यामुळे सामान्यांच्या घर बांधकामाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
रेती व्यवसायाअभावी ट्रॅक्टरचे व्यवसाय बंद पडल्याने मजुरांची कुटुंबेही आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे तालुक्यातील वर्धा नदीसह इतर लहान -मोठ्या नद्या व नाल्यांवरील रेती घाटांचा लिलाव करून न्यायाची भूमिका घेण्यात यावी, अशी मागणीही तहसीलदार यांच्यामार्फत जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना करण्यात आली.
निवेदन देताना ग्राहक पंचायतचे शाखाध्यक्ष विश्वनाथ खोंड, नारायण चव्हाण, शेख जुम्मन, भाऊराव क्षीरसागर, मीनाक्षी शिदोडकर, शेख जुम्मन शेख मुनीर व पदाधिकारी उपस्थित होते.