बोरधरणवर पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर
By Admin | Updated: July 13, 2016 02:51 IST2016-07-13T02:51:52+5:302016-07-13T02:51:52+5:30
चारही बाजूंनी टेकड्यांनी वेढलेल्या तसेच हिरव्यागार दृश्य व निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी बोरधरण येथे हजारो पर्यटक येतात.

बोरधरणवर पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर
पाटबंधारे विभागाचा कानाडोळा : ५१ वर्षांपासून पर्यटक सुविधांच्या प्रतीक्षेत
विजय माहुरे घोराड
चारही बाजूंनी टेकड्यांनी वेढलेल्या तसेच हिरव्यागार दृश्य व निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी बोरधरण येथे हजारो पर्यटक येतात. या पर्यटकांची सुरक्षा आजही वाऱ्यावरच आहे. बोरधरणाला ५१ वर्षे झाली असताना पर्यटकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत पर्यटकांना सुरक्षा व सुविधा पुरवाव्या, अशी मागणी करण्यात येत आहे.
बोर नदीवर सेलू येथून १७ किमी अंतरावर बोरी गावाच्या पूढे १९५७ मध्ये धरणाच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली. या धरणाचे बांधकाम १९६५ मध्ये पूर्ण झाले. तेव्हापासून हे धरण बोरधरण म्हणून ओळखले जाऊ लागले. या धरणाला यशवंत धरण, असेही नाव आहे. जिल्ह्यात निसर्गरम्य असलेल्या बोरधरण या पर्यटकांना मोहीत करणाऱ्या स्थळाला शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे; पण पर्यटकांना अद्याप कुठल्याही सोयी सुविधा पुरविण्यात आल्या नाही. परिणामी, पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पर्यटन विकास महामंडळाने रिसोर्ट सुरू केले असले तरी बालोद्यान मोडकळीस आले आहे. यामुळे परिवारासह आलेल्या पर्यटकांना धरणाच्या भिंतीवरच आपली शिदोरी उघडून सहभोजनाचा आनंद घ्यावा लागत आहे.
सद्यस्थितीत धरणामध्ये पाण्याची पातळी कमी आहे. यामुळे पर्यटक प्रतिबंधीत क्षेत्र असतानाही धरणामध्ये जाताना दिसतात. एवढेच नव्हे तर धरणातील पाण्यात पोहण्याचा तसेच आंघोळीचा आनंद पर्यटक घेताना दिसतात. त्यांना मनाई करण्यासाठी कुणी सुरक्षा कर्मचारीही नसल्याने पर्यटक लहान मुलांनो सोबत घेऊन तेथील पाण्याचा आनंद लुटतात. हा आनंद घेत असताना काही विपरित घडले तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बोरधरण सकाळपासून सायंकाळपासून खुले असते; पण रात्री उशिरापर्यंत पर्यटक येथे धरणाच्या परिसरात वावरत असल्याचे दिसून येते. यामुळे पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची स्थिती आहे. येथे सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे गरजेचे झाले आहे. या स्थळाला नागपूर, वर्धा जिल्ह्यातील पर्यटक, शाळांच्या सहली येतात. बोर व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी येणारे पर्यटकही हिरव्यागार दृश्याचा तसेच धरणाचा आनंद घेतात. पर्यटकांना शासनाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाऊस सुरू असताना किमान उभे राहण्यासाठी जागोजागी निवारे, वाहनतळाची व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कर्मचारी नियुक्त करणे तसेच फलक लावणे गरजेचे आहे.
या परिसरात फेरफटका मारला असता दारूच्या रिकाम्या शिशाही जागोजागी दिसून येतात. बोरधरण हे पाटबंधारे विभागांतर्गत येत असून सर्वात जुने पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह आहे. त्या विश्रामगृहाचे नूतनीकरण करणे गरजेचे झाले आहे. शासनाकडून पर्यटन स्थळाच्या विकासासाठी लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते. याद्वारे पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो; पण बोरधरण येथे त्याचा अभाव दिसतो. पर्यटन स्थळी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देताना टेकड्यांच्या मधोमध असलेले धरण, हिरवा शालू परिधान केलेल्या टेकड्या, बोर व्याघ्र प्रकल्प पाहता या स्थळाच्या विकासाकडे लक्ष दिल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास वाव आहे.
बोरधरण निर्मितीमुळे परिसरातील कृषी क्षेत्र सुजलाम सुफलाम झाले; पण ज्या विभागाचा या परिसराच्या विकासाला हातभार लागला, त्याच पाटबंधारे विभागाच्या वसाहतीची दुरवस्थेकडे वाटचाल दिसते. अपूरे कर्मचारी, पाटचऱ्या, सायपणची दयनिय स्थिती तालुक्याच्या विकासाला मारक तर ठरणार नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. बोरधरणावर पावसाळ्याच्या दिवसांत होणारी गर्दी लक्षात घेता येथे सुरक्षा व्यवस्था निर्माण करीत सुविधा प्रदान कराव्या, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.