विद्युत तारांचा स्पर्श; शेतकऱ्यासह बैल व गाईचा मृत्यू
By Admin | Updated: August 23, 2014 01:59 IST2014-08-23T01:59:38+5:302014-08-23T01:59:38+5:30
शेतातील काम आटोपून घरी परत येत असलेल्या शेतकऱ्याला रस्त्याने जाताना शेताच्या धुऱ्याला लावलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श झाला.

विद्युत तारांचा स्पर्श; शेतकऱ्यासह बैल व गाईचा मृत्यू
दहेगाव (गोसावी) : शेतातील काम आटोपून घरी परत येत असलेल्या शेतकऱ्याला रस्त्याने जाताना शेताच्या धुऱ्याला लावलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श झाला. यात शेतकऱ्यासह त्याची एक गाय व एका बैलाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास किन्हाळा शिवारात घडली. चिंधुजी कवडू राऊत (६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतातील कामे आटोपून चिंधूजी त्यांच्या बैलबंडीने घराकडे येत असताना त्यांचा मार्ग येथील विठ्ठल बांगडे यांच्या शेतातून येतो. त्यांच्या शेतातून येताना चिंधूजी यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या गाईला विजेचा धक्का बसला. विजेचा धक्का बसताच गाय खाली कोसळली. यातच तिचा तिचा जागीच मृत्यू झाला. गाईला काय झाले हे पाहण्याकरिता चिंधुजी बंडीच्या खाली उतरले असता त्यांनाही विजेचा धक्का बसला. यात त्यांचाही मृत्यू झाला. याचवेळी बैलबंडीला जुंपून असलेल्या त्यांच्या एका बैलाचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. रात्री उशिरा झाला तरी चिंधुजी घराकडे परतले नसल्याने त्यांच्या घरच्यांनी शेताकडे जावून पहिले असता रस्त्यात जाताना हा प्रकार त्यांच्या नजरेस पडला. घटनेची माहिती वीज वितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. याप्रकरणी विठ्ठल बांगडे याच्याविरूद्ध पोलिसांनी भादंविच्या कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. बांगडे याला अद्याप अटक करण्याची आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)