भर उन्हाळ्यातही त्यांनी जगविले वृक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 22:06 IST2019-08-03T22:06:25+5:302019-08-03T22:06:44+5:30
येथील सामाजिक वनीकरणच्या केळझर येथील मध्यवर्ती रोपवाटिकेत भर उन्हाळ्यात पाण्याची जुळवाजुळव करून जगविलेली ६ लाख ६ हजार १६७ रोपे वृक्ष लागवडीसाठी शासकीय, निमशासकीय संस्थांना शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेत देण्यात येत आहेत.

भर उन्हाळ्यातही त्यांनी जगविले वृक्ष
प्रफुल्ल लुंंगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : येथील सामाजिक वनीकरणच्या केळझर येथील मध्यवर्ती रोपवाटिकेत भर उन्हाळ्यात पाण्याची जुळवाजुळव करून जगविलेली ६ लाख ६ हजार १६७ रोपे वृक्ष लागवडीसाठी शासकीय, निमशासकीय संस्थांना शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेत देण्यात येत आहेत. तर सामाजिक वनीकरण विभागाने रस्त्याच्या दुतर्फा कॅनल रोडने ४९ हजार ५०० रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन सुरू केले आहे.
ग्रामपंचायतीद्वारे तीन-चार वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या लागवडीपैकी दहा टक्केदेखील रोपटी जिवंत नाहीत. मात्र, सामाजिक वनीकरणने उत्कृष्ट नियोजन करीत शंभर टक्के झाडे जगवित त्यांचे संगोपन केले आहे. शेतकरी धुरे पेटविताना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांना इजा पोहोचवित असल्याने तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या वृक्षांची होळी होतानाचे चित्र मात्र वेदनादायी आहे.
सामाजिक वनीकरणचे वनक्षेत्रपाल आर. एम. दवंडे यांनी यंदा केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल त्यांच्याप्रति नागरिकांत आपुलकी वाढली आहे. अधिनस्थ कर्मचाऱ्यांकडे त्यांनी सामाजिक वनीकरणचे काम लोकाभिमुख केले आहे.
यंदाच्या प्रखर उष्णतामानात रोपांना जगविण्यासाठी कामावर असलेले सेवानिवृत्त कर्मचारी एन.एस. निखाते यांनी रोपवाटिकेला लागून असलेल्या रमेश कोपरकर यांना विनंती करीत पाईपलाईन टाकून घेतली. मोटारपंपाद्वारे विहिरीतील पाणी रोपवाटिकेसाठी घेवून रखरखत्या उन्हाळ्यात सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून रोपवाटिका हिरवीगार केल्याने त्यांची वनक्षेत्रपाल आर.एम. दवंडे यांनी पाठ थोपटली, हेही तेवढेच खरे आहे.
वनरक्षक आर. डी. बहादुरे, वनपालक विश्वास सिरसाट यांनीही या कार्यात अतिशय परिश्रम घेतले. सामाजिक वनीकरणच्या कर्मचाऱ्यांनी जगविलेली रोपे आणि आता लागवडीच्या केले उत्कृष्ट नियोजनाबाबत लागवड अधिकारी (वनक्षेत्रपाल) आर.एम. दवंडे यांचे जीव ओतून काम करण्याच्या पद्धतीचे इतरांनाही अनुकरणे करण्याजोगे आहे.
मध्यवर्ती केळझर येथे सन २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीकरिता २५ बाय ४० आकाराच्या पॉली बॅगमध्ये ५८ हजार ६२५ व २० बाय ३० आकाराची पॉली बॅगमध्ये १ लाख ५८ हजार ५४० व १२.५ बाय २५ च्या पॉलीबॅगमध्ये ३ लाख ८९ हजार अशी एकूण ६ लाख ६ हजार १६७ रोपे तयार करण्यात आली. यासाठी १८ मजूरांना रोजगार प्राप्त झाला. योग्य नियोजनामुळे ३३ कोटी वृक्ष लागवडीत ही रोपे लावण्याचे कामी आली. सर्वांच्या सहकार्याने सामाजिक वनीकरण काम समाधानकारक सुरू आहे.
आर.एम. दवंडे, वनक्षेत्रपाल,सामाजिक वनीकरण विभाग, सेलू.