तीन वर्षांपासून विकासकामे ठप्प
By Admin | Updated: September 1, 2014 00:08 IST2014-09-01T00:08:56+5:302014-09-01T00:08:56+5:30
येथील नगर परिषदेच्या प्रभाग क्रं. १ मध्ये गत तीन वर्षांपासून विकासकामे ठप्प आहेत. या प्रभागात गेल्या तीन वर्षात रस्ते, नाल्या व इतर मुलभूत सोईसुविधांचे एकही काम झाले नसल्याने येथील

तीन वर्षांपासून विकासकामे ठप्प
आर्वी : येथील नगर परिषदेच्या प्रभाग क्रं. १ मध्ये गत तीन वर्षांपासून विकासकामे ठप्प आहेत. या प्रभागात गेल्या तीन वर्षात रस्ते, नाल्या व इतर मुलभूत सोईसुविधांचे एकही काम झाले नसल्याने येथील नागरिक रोष व्यक्त करीत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी व प्रभागातील एकतरी काम व्हावे अशी नागरिकांद्वारे केली जात आहे.
आर्वी नगर परिषदेमध्ये सध्या भाजपाची सत्ता आहे. या पक्षाच्या प्रभागातील विकासकामांच्या भूमिपूजनाचा सपाटा सध्या आर्वीत सुरू आहे. यात काँग्रसच्या प्रभागातील मंजूर कामांचा ठराव विद्यमान नगरसेवकांनी रद्द करून आपल्याच प्रभागातील कामे करण्याचा सपाटा सुरू केलाचा आरोप होत आहे. या परिसरातील एलआयसी कॉलनी, संजय नगर, आंबेडकर वॉर्ड, साईनगर आदी भागातील सहा हजार नागरिकांना मुलभूत सोईसुविधेसाठी नगर परिषदेचे उंबरठे झिजवावे लागत आहे. त्यामुळे जनमानसात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रभागात कुठलेही विकासाचे काम न झाल्याने कॉग्रेसच्या माजी नगराध्यक्षा किरण मिस्कन यांनी भाजपा नगराध्यक्ष दुर्गेश पुरोहित यांना पत्र लिहून विकासकामे करण्याची व या प्रभागातील प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली आहे.
आर्वी शहरातील प्रत्येक वार्डात घाणीचे साम्राज्य असून शहरातील कचरागाडीही बंद आहे. वॉर्डातील खुल्या जागेत गाजरगवत, अंतर्गत रस्त्यावर खड्डे, मायाबाई वॉर्डातील सार्वजनिक शौचालयात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. साईनगर येथील स्वामी समर्थ उद्यानाची दुरावस्था झाली आहे. परिसरातील नाला सफाई न झाल्याने या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचप्रमाणे साईनगर परिसरातील सिमेंट रस्त्यांचे काम वर्क आर्डरनुसार नसल्याचे बोलल्या जात आहे. जिल्हा नियोजन समितीतून दलित वस्तीला निधी नाही. त्यामुळे त्या वस्त्यांचा विकासही खुंटला आहे. शासनाच्या लोकोपयोगी योजनांची जनजागृती नाही, रस्ता विकास निधी अंतर्गत प्रभागात समान वाटप नाही. अशी अनेक विकासकामे गत काही वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळे या मागण्या तातडीने मान्य करून विकासकामे करण्याची मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)