‘त्या’ दोन चिमुकल्यांचे पुन्हा शवविच्छेदन
By Admin | Updated: May 9, 2015 01:57 IST2015-05-09T01:57:05+5:302015-05-09T01:57:05+5:30
पाण्यात बुडून नाही तर विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा आरोप धावसा येथील मोरश्वर वझरकर व शेलेश करणाके या मृतक मुलांच्या पालकांनी केला होता.

‘त्या’ दोन चिमुकल्यांचे पुन्हा शवविच्छेदन
कारंजा (घाडगे) : पाण्यात बुडून नाही तर विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा आरोप धावसा येथील मोरश्वर वझरकर व शेलेश करणाके या मृतक मुलांच्या पालकांनी केला होता. त्यांच्या आरोपानुसार या मृतकांचे पुन्हा शवविच्छेदन करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले होते. यावरुन शुक्रवारी या दोघांचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा अहवाल अद्याप मिळाला नसल्याने दोघांचा मृत्यू नेमका कशाने झाला, ही बाब आता रहस्यमय बनली आहे.
तालुक्यातील धावसा (हेटी) येथील मोरेश्वर वझरकर (१२ ) व शैलेश करणाके (१४) या दोघांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे समोर आले. यावेळी डॉक्टरांनीही त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा अहवाल दिला होता. मात्र त्यांच्या पालकांनी केलेल्या आरोपामुळे उपविभागीय अधिकारी एम.आर.चव्हाण यांनी या दोघांचे मोक्यावर जात पुन्हा शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले होते.
त्यांच्या आदेशानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय व सेवाग्राम रुग्णालयाचे डॉ़ पवन वानखेडे, डॉ़ संजय गाठे, डॉ़ बिसेन, डॉ शीतल सोलंकी यांनी शवविच्छेदन केले. यावेळी नायब तहसीलदार गणेश बर्वे, पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांची उपस्थिती होती.
तपासणीकरिता आलेल्या चमूने या दोघांच्या मृतदेहाचे व्हिसेरा घेत त्याची प्रयोग शाळेत तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. हा अहवाल येण्यास काही दिवसाचा काळा लागणार असल्याने या दोघांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे स्पष्ट सांगता येत नसल्याचे तपासणी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या अहवालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)