प्रबोधनवादी चळवळींचा विचार रूजवा
By Admin | Updated: August 14, 2014 00:02 IST2014-08-14T00:02:52+5:302014-08-14T00:02:52+5:30
महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकर विचारांमुळे प्रगतीला चालना मिळाली. मात्र अलीकडे याच राज्यात अन्याय अत्याचाराच्या घटना सतत वाढत आहेत. या निंदनीय घटना टाळायच्या असतील

प्रबोधनवादी चळवळींचा विचार रूजवा
अन्वर राजन : बजाज वाचनालयात परिवर्तननिष्ठ संघटनांची बैठक
वर्धा : महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकर विचारांमुळे प्रगतीला चालना मिळाली. मात्र अलीकडे याच राज्यात अन्याय अत्याचाराच्या घटना सतत वाढत आहेत. या निंदनीय घटना टाळायच्या असतील तर प्रबोधनवादी चळवळीचा विचार समाजात रूजविण्यासाठी सुशिक्षित वर्गाने पुढाकार घेतला पाहिजे, असे मत महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, पुणे येथील विश्वस्त व विचारवंत अन्वर राजन यांनी व्यक्त केले.
शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी ९ आॅगस्ट १९८९ ला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. या घटनेला पंचविस वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने वर्धा शाखेच्या वतीने स्थानिक सत्यनारायण बजाज वाचनालयात परिवर्तनवादी संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान बदलती परिस्थिती आणि चळवळीसमोरील आव्हाने या विषयावर ते बोलत हाते. मंचावर राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार, किसान अधिकार अभियानचे प्रेरक अविनाश काकडे, जनवादी महिला संघटनेच्या प्रभा घंगारे, कॅम्युनिष्ट पक्षाचे राजू गोरडे, महाराष्ट्र अंनिसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले, प्रजासत्ताक शिक्षण संघटनेचे अरूणकुमार हर्षबोधी उपस्थित होते.
अन्वर राजन म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी प्रबोधनासाठी आपल्या जिवाचे बलिदान दिले. ज्या विषम समाजव्यवस्थेने त्यांचा कार्याचा प्रतिकार केला. त्या शक्ती आजही या राज्यात कायम आहेत. या व्यक्तीने आपल्या कुटुंबाची पर्वा न करता प्रबोधनासाठी प्राण गमावले, त्यांच्या हा परिवर्तनिष्ठ विचार गावागावात पोहचविला पाहिजे. चळवळी जिवंत राहिल्या तरच शोषितांच्या प्रश्नांवर लढे उभारण्यासाठी ताकत मिळू शकेल, त्यासाठी नोकरदारवर्गाने आपला वेळ देणे गरजेचे आहे. राजन यांच्या व्याख्यानानंतर दुसऱ्या सत्रात अविनाश काकडे म्हणाले, समाजातून विवेकीपण नष्ट होत आहे. राजकीय नेत्यांवर जनतेचा विश्वास उडाला. त्यामुळे सामाजिक चळवळी चालविणाऱ्या कार्यकर्त्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे. डॉ. नरेंद्र दाभोळर यांची हत्या होऊन एक वर्षे पूर्ण झाले. मात्र अजूनही मारेकऱ्यांना ताब्यात घेण्यास राज्यसरकारला यश आले नाही. या हत्येमागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी सरकारवर दबाव वाढावा म्हणून येत्या २० आॅगस्टला कृती कार्यक्रम घेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. हा संकल्प कसा कृतिशील करता येईल. याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी प्रा. जनार्दन देवतळे, विशाल चौधरी, शाम मोहन, सुनील घिमे, प्रा. नुतन माळवी, हसीना गोरडे, मयूर राऊत, गौतम पाटील, दिनेश प्रसाद, मिसाळ, ढगे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन प्रकाश कांबळे, प्रास्ताविक पुजा जाधव, सारिका तर आभार भारत कोमावर यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)