सेवाग्रामात खादीच्या राख्यांची परंपरा कायम

By Admin | Updated: August 29, 2015 02:14 IST2015-08-29T02:14:56+5:302015-08-29T02:14:56+5:30

भारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधनाला महत्त्व आहे. या सणाकरिता बाजारात विविध आकारातील राख्या येत असतात;...

There is a tradition of Khadi conservation in Sewagram | सेवाग्रामात खादीच्या राख्यांची परंपरा कायम

सेवाग्रामात खादीच्या राख्यांची परंपरा कायम

५०० राख्यांची निर्मिती: महात्मा गांधींच्या विचारानुसार शिक्षणाचा प्रयत्न
दिलीप चव्हाण सेवाग्राम
भारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधनाला महत्त्व आहे. या सणाकरिता बाजारात विविध आकारातील राख्या येत असतात; मात्र महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सेवाग्राम आश्रमात खादीच्या सूताच्या राख्या तयार करून त्या बांधण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. ती आताही कायम असल्याचे चित्र आहे. येथील आनंद निकेतन विद्यालयामध्ये विद्यार्थी सूतापासून तयार केलली राखी बांधून रक्षाबंधन साजरे करीत असल्याचे दिसून आले आहे.
सन १९३८ पासून महात्मा गांधीजींच्या विचार तत्त्वावर आणि अध्ययनावरून नव्या शिक्षण प्रयोगाला प्रारंभ झाला. याची संपूर्ण जबाबदारी इ.डब्ल्यू आर्यनायकम व आशादेवी या दाम्पत्यावर होती. हिंदुस्थानी तालिमी संघ नंतर नई तालिम व आताचा आनंद निकेतन असा थोडा बदल झाला.
नई तालीम ही शिक्षण पद्धती नसून संपूर्ण जीवन शैलीची विचारधारा आहे. अहिंसक समाज रचनेतून आदर्श नागरिक निर्माण होवू शकतात. कामाद्वारे शिक्षण प्रणाली असली तरी यात सांस्कृतिक आणि कलेला फार महत्त्व आहे. आपल्या संस्कृती व सणांचे ज्ञान विविध कार्यक्रम व सणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत होते.
रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहाने शाळेतच नव्हे तर संस्थेत साजरा केल्या जात होता. शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी खादी सुताला रंग देणे, साधी तसेच रंगीत राख्या बनविण्यात मग्न होवून जातात. काही तर आपल्या कल्पकतेने सुंदर राख्या बनवून शाबासकीही मिळवितात. रक्षाबंधनदिनी गाणी गायली जातात. विद्यार्थी, शिक्षक आणि कार्यकर्त्यांना राखी बांधून या सणाचे महत्त्व विषद केल्या जात होते. समिती आणि आनंद निकेतन विद्यालयाने ही परंपरा आजही कायम ठेवली आहे.
१५ दिवसांपासून सूतकताईला प्रारंभ
सेवाग्राम आश्रम परिसरात असलेल्या आनंद निकेतन येथे राबविण्यात येत असलेल्या या अभियानाला रक्षाबंधनाच्या १५ दिवसांपूर्वीपासून सुरुवात होते. यात शाळेतील वर्ग ३ ते ९ पर्यंतचे सर्वच विद्यार्थी सहभागी होत असतात. त्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या सूताच्या माध्यमातून राख्या तयार करण्यात येत असतात. या राख्या शाळेतील विद्यार्थ्यांकरिता विक्रीकरिता ठेवण्यात आल्या आहेत. या राख्या १० ते २० रुपयांपर्यंत विक्रीला ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
यंदा विद्यार्थ्यांनी ५०० राख्या तयार केल्या आहेत. त्यापैकी ३०० राख्या विकल्या गेल्याचे सांगण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका असा संदेशही दिल्या जात आहे.

Web Title: There is a tradition of Khadi conservation in Sewagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.