तक्रारपेट्या हवेतच विरल्या

By Admin | Updated: April 28, 2015 02:00 IST2015-04-28T02:00:26+5:302015-04-28T02:00:26+5:30

शाळेत शिक्षकांकडून, मुलांकडून वा गावगुंडाकडून होत असलेल्या त्रासाची तक्रार करण्यास मुली धजावत नाहीत. यामुळे

There is no need for complaints | तक्रारपेट्या हवेतच विरल्या

तक्रारपेट्या हवेतच विरल्या

नागपूरच्या सामाजिक संस्थेकडून शाळा-महाविद्यालयांकरिता होता उपक्रम
वर्धा :
शाळेत शिक्षकांकडून, मुलांकडून वा गावगुंडाकडून होत असलेल्या त्रासाची तक्रार करण्यास मुली धजावत नाहीत. यामुळे मुलींचे लैगिक शोषण होण्याची भीती वर्तविली जाते. यावर आळा बसविण्याकरिता नागपूर येथील अग्रसेन संस्थान या सामाजिक संस्थेने शाळा महाविद्यालयात तक्रारपेट्या लावण्याचा गाजाबाजा केला होता. त्याला जिल्हा प्रशासनाची परवानगीही मिळाली होती. त्या पेट्यातील तक्रारी पोलिसात जाणार होत्या. याला वर्षाचा कालावधी झाला आहे. महाविद्यालयाच्या परिसरात लावण्यात येणार असलेल्या या पेट्यांचा उपक्रम हवेतच विरल्याचे दिसत आहे. या पेट्यांची माहिती पोलीस विभागालाही नसल्याचे सोमवारी पुढे आले.
जिल्ह्यात शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण होत असल्याचे अनेक घटनांतून समोर आले आहे. काही प्रकरणात गुन्हेही दाखल आहेत. अशा स्थितीत महाविद्यालयाच्या परिसरात या पेट्या असल्यास त्या मदतीच्या ठरणाऱ्या असत्या. यातून शाळेत वा महाविद्यालयात सुरू असलेला प्रकार उजेडात येण्याची शक्यता होती; मात्र तसे झाले नाही. या पेट्या लावणाऱ्या संस्थेने केवळ वाहवाह मिळवून घेण्याकरिता हा ऊठाठेव तर केला नाही ना अशी चर्चा शहरात जोर धरत आहे. या सामाजिक संस्थेकडून लावण्यात आलेल्या पेट्यांची किल्ली शाळेच्या मुख्याध्यापकासह पोलीस विभागाकडे देण्यात येणार होती. त्यातील तक्रारीवरुन पोलीस विभागाला होणाऱ्या प्रकाराची माहिती मिळण्यास मदत झाली असती.
तक्रारपेट्या लावण्याच्या बाता करून वास्तविकतेत त्या लावण्याचा विसर या संस्थेला पडल्याचे दिसत आहे. पेट्या लावण्यासंदर्भात या संस्थेकडून जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुचनाही देण्यात आल्या होत्या. पण पेट्याच लागल्या नसल्याने त्यावर कार्यवाही करण्याकरिता पोलीस विभाग हतबल ठरत आहे. शहरातील एका नामांकित महाविद्यालयात एका प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाला. यात प्राध्यापकाच्या भीतीपोटी या विद्यार्थिनीने बऱ्याच दिवसानंतर तक्रार केली. आता या विद्यालयातील इतर विद्यार्थिनींचे बयान नोंदविणे सुरू आहे. असाच प्रकार येथील एका केंद्रिय विद्यालयातही घडला. यात प्रारंभी विनयभंग व नंतर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. शिक्षकाच्या या लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या विद्यार्थिनीवर शाळा सोडण्याची वेळ आली. आलेल्या मानसिक दडपणामुळे तिची प्रकृती खालावली. या पेट्या असत्या तर कदाचित हा प्रकार टाळता येवू शकला असता अशा प्रतिक्रीया सर्वत्र मिळत आहेत.(प्रतिनिधी)

हमदापूर येथील एका विद्यालयात लावली पेटी
जिल्ह्यातील हमदापूर येथील यशवंत विद्यालयात दहेगाव पोलीस ठाण्याकडून देण्यात आलेली पेटी लावण्यात आली. दहेगाव पोलिसांना ही पेटी याच सामाजिक संस्थेकडून मिळाल्याची माहिती आहे. ती पेटी आतापर्यंत एकच वेळा मुख्याध्यापकाच्या हातून उघडण्यात आली. यात एकही तक्रार मिळाली नाही, ही आनंदाची बाब आहे. मात्र पोलीस विभागाच्यावतीने कधी या पेटीकडे वळून पाहिलेही नसल्याचे वास्तव आहे. यामुळे दहेगाव पोलिसांनी केवळ त्यांच्याकडे आलेली पेटी शाळेत लावण्याकरिता देवून आपली जबाबदारी संपली असे समजून त्याकडे पाहिलेही नाही.

शाळेत पेट्या लावण्याकरिता आले होते पत्र
बदनामीच्या कारणास्तव विद्यार्र्थिनी तक्रारीस धजावत नाही. पण अन्याय कर्त्याविरुद्ध योग्य कारवाई व्हावी याकरिता तक्रारी गरजेच्या आहेत. अन्याया विरोधात दाद मिळावी यासाठी तक्रारकर्त्यांना शाळेतच जिल्हा प्रशासन व अग्रसेन संस्थान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत तक्रार पेटी लावण्यात येईल आणि तक्रारीची दखल घेतल्या जाईल अशा आशयाचे पत्र ३० जानेवारी २०१४ रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून शिक्षणाधिकारी कार्यालयात आले. तेथून हे पत्र गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पोहोचले. तेथून जिल्ह्यातील शाळेत आले. यानुसार जिल्ह्यातील विविध शाळांत या पेट्या लावण्याचा निर्णय झाला. वर्षभराचा कालावधी झाला असताना अशा तक्रार पेट्या लावण्यात आल्याच नसल्याचे समोर येत आहे.

शाळा महाविद्यालयात तक्रारपेट्या लावण्यासंदर्भात एका सामाजिक संस्थेने संपर्क केला होता. त्यांना पोलीस विभागाच्यावतीने होकार देण्यात आला होता; मात्र त्यांच्याकडून तशा पेट्या कुठे लावण्यात आल्याचे नाही, वा तशी माहिती त्यांनी पोलिसांना दिलीच नाही. आजच्या घडीला तशा पेट्या कुठे आहेत याची माहितीही पोलिसांकडे नाही.
- अनिल पारस्कर, जिल्हा पोलीस अधीक्षक, वर्धा

Web Title: There is no need for complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.