वर्षभरापासून इमारतीची प्रतीक्षा कायमच
By Admin | Updated: July 10, 2014 23:44 IST2014-07-10T23:44:26+5:302014-07-10T23:44:26+5:30
वाढता ताण व गुन्ह्याचा वाढत आलेख पाहता राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तळेगाव (श्यामजीपंत) येथे नवे पोलीस ठाणे तयार करण्यात आले. या पोलीस ठाण्याला गुरुवारी एक वर्षाचा कालावधी झाला

वर्षभरापासून इमारतीची प्रतीक्षा कायमच
तळेगाव पोलीस ठाणे झाले एक वर्षाचे
वर्धा : वाढता ताण व गुन्ह्याचा वाढत आलेख पाहता राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तळेगाव (श्यामजीपंत) येथे नवे पोलीस ठाणे तयार करण्यात आले. या पोलीस ठाण्याला गुरुवारी एक वर्षाचा कालावधी झाला असला तरी ठाण्याला हक्काची इमारत मिळाली नाही. या वर्षभरात या ठाण्याने दोन ठाणेदार पाहिले. ३९ गावांचा कारभार पाहणाऱ्या या ठाण्याला स्वत:ची हक्काची इमारतही नसल्याची खंत येथील पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
आष्टी तालुक्याच्या एका कोपऱ्यावर असलेल्या तळेगाव (श्यामजीपंत) येथे राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथे घटनांचा आलेख वाढत होता. येथे घडलेल्या घटनांचा पाठलाग करणे आर्वी पोलिसांना अवघड जात होते. यामुळे येथे पोलीस ठाणे देण्याची मागणी होती. यानुसार ही मागणी पूर्ण होवून १० जुलै २०१३ रोजी तळेगाव (श्यामजीपंत) येथे पोलीस ठाणे तयार करण्यात आले. या ठाण्याचे पहिले ठाणेदार म्हणून सहायक पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे यांची वर्णी लागली. त्यांनी सांभाळलेल्या या ठाण्याचे दुसरे ठाणेदार म्हणून सहायक पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांची नियुक्ती करण्यात आली. ते या ठाण्याचे काम सांभाळत आहेत.
३९ गावांचा कारभार सांभाळणाऱ्या या पोलीस ठाण्यात एकूण ३९ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. या ठाण्यात आष्टी व कारंजा तालुक्यातील १० तर आर्वी तालुक्यातील १९ गावांचा समावेश आहे. या कारणाने असलेला कर्मचारी वर्ग अपूरा पडत असल्याचे सांगण्यात येत आहे.
वर्षभरात या ठाण्यात अनेक आठवणी आहेत. या ठाण्यांतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅव्हल्समधून एका इसमाला पळवून त्याच्याजवळून २२ लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली होती. याच पोलीस ठाण्यांर्गत ट्रॅव्हल्स जळीत प्रकरण घडले. २९ मे रोजी झालेल्या या प्रकरणात चार जणांचा मृत्यू झाला. साखर लंपास करून ट्रक जाळल्याची घटना घडली. यात ट्रकचा मालक, त्याचे वडिल व चालक या तिघांना अटक करण्यात आली. तक्रारीकरिता गेलेल्याला मारहाण केल्याप्रकरणी तळेगाव येथील नागरिकांनी ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या बदलीकरिता बंदही ठेवला होता. (प्रतिनिधी)