लोकमत न्युज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी व तूर आदी पिकांची प्रचंड नासाडी झाली असून, आजही शेतशिवार पाण्याखाली आहे. काही पिके यातून वाचविली; पण त्यावर चारकोल रॉट, येलो मोड़ॉक व खोडकिडीचा प्रादुर्भाव असल्याने हातातोंडाशी आलेला घासही या पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदाच आज उपासमारीच्या उंबरठ्यावर असल्याने तातडीने सरकारने उपाययोजना करावी. ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी गुरुवारी शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चातून केली.
वर्ध्यात क्रांतिकारक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर व विदर्भअध्यक्ष तथा युवा संघर्ष मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी स्थानिक बजाज चौकातून या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली असून, या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी सरकारविरोधात विविध घोषणा आंदोलकांकडून करण्यात आल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली
वर्धा जिल्ह्यात १ जून २०२५ ते २३ सप्टेंबर २०२५ या कालावधीत एकूण ९८८.७ मिमी पाऊस झाला आहे. यंदा सरासरीपेक्षा २१ टक्के पाऊस झाला असून एकट्या सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा १३७ टक्के पाऊस पडला. या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ५४ मंडळांपैकी फक्त ३५ मंडळांत अतिवृष्टी झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरीही उर्वरित १९ मंडळांत देखील पिकांचे नुकसान झाले असून, सरसकट दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची गरज आहे.
यांची होती उपस्थिती...
या मोर्चात प्रवीण कात्रे, अॅड. मंगेश घुंगरूड, समीर सारजे, सागर दुधाने, लोमहर्ष बाळबुधे, मनोज नागपुरे, संदीप दिधीकर, गौतम पोपटकर, गोपाल चोपडे, स्वप्नील मदणकर, वैभव नगराळे, आशिष भोकरे, तुषार झोड, मंगेश वानखेडे, शेखर धोंगडे, दिनेश गुळघाने, राजू ढगे, इरफान शेख, आसिफ इकबाल, सुनील विपुलवार, गौरव खोपाळ, गजानन ताकसांडे, अंकुश दाभीरे, राहुल पेटकर, सूरज मांडवकर, अनिकेत मानकर, रूपराव खैरकार, दिलीप बालबुथे, सौरभ गोडे यांच्यासह जिल्ह्यातून असंख्य शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांच्या या आहेत मागण्या
वर्धा जिल्ह्यात तत्काळ ओला दुष्काळ घोषित करावा, नुकसानग्रस्तांना हेक्टरी ५० हजारांची सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, जुनीच पीकविमा पद्धत ठेवून त्याचे निकषसुद्धा बदलवू नयेत, जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी मजबूत तार कुंपणाची योजना मोफत द्यावी, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी विशेष पॅकेज व कायमस्वरूपी उपाययोजना अमलात आणाव्यात, पाणंद रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण करावे, शेतमजुरांसाठी महामंडळ स्थापन करून त्यांना मदत करावी, स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी तत्काळ लागू कराव्यात आदी मागण्या सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आल्या.
...तर मोठा संघर्ष उभारला जाईल !
शेतकऱ्यांनी घामाने पिकवलेला घास हिरावला आहे. घरखर्च, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, पिकांचे कर्ज आतापर्यंत कोणतीही मदत जाहीर न केल्याने प्रचंड रोष आहे. आपला शेतकरी जगला पाहिजे, या उद्देशाने तातडीने शासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा संघटनेच्या वतीने संघर्ष उभा केला जाईल, असा इशाराही निवेदनातून दिला आहे.
Web Summary : Wardha farmers, facing crop losses from excessive rain and pests, protested demanding immediate government aid, a complete loan waiver, and declaration of a wet drought. They warned of intensified agitation if demands are unmet.
Web Summary : वर्धा के किसानों ने अत्यधिक बारिश और कीटों से फसल के नुकसान के कारण विरोध प्रदर्शन किया, जिसमें तत्काल सरकारी सहायता, पूर्ण ऋण माफी और गीले सूखे की घोषणा की मांग की गई। उन्होंने मांगें पूरी न होने पर आंदोलन तेज करने की चेतावनी दी।