शेतकऱ्याचा मित्र ‘शिवा’ अश्वाने घेतला अखेरचा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 05:00 IST2022-05-06T05:00:00+5:302022-05-06T05:00:15+5:30
तीन वर्षाचा अश्व ‘शिवा’च्या शरीराच्या पायावर असलेल्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती असल्याची आस्था नागरिकांमध्ये होती. त्यामुळेच शेतकरी हरीष याने त्याचे नाव ‘शिवा’ ठेवले होते. अश्वाकडे पाहिल्यावर महाराजांचे चित्र डोळ्यासमोर येत असल्याने नागरिकांनाही दर्शन होत होते, हे विशेष. अचानक चार दिवसांपूर्वी अश्वाची प्रकृती बिघडली अन् तेव्हापासून तो अशक्त झाला होता. अखेर बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.

शेतकऱ्याचा मित्र ‘शिवा’ अश्वाने घेतला अखेरचा श्वास
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्याच्या साथीला असलेल्या...घरातील कुटुंबीयांच्या तसेच गावातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या... इतकेच नव्हे तर विविध पालखी, दिंड्या, मिरवणुकांमध्ये सहभागी होत बँडच्या तालावर ठेका धरून नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा तीन वर्षाचा अश्व ‘शिवा’ याची अचानक प्रकृती बिघडली अन् त्याने अखेरचा श्वास घेतला. शिवाच्या अचानक जाण्याने अंत्यविधीसाठी गावात जनप्रक्षोभ उसळला. भानखेडा येथील प्रगतिशील शेतकरी हरीष कृष्णाजी चौधरी यांनी तीन वर्षांपूर्वी हिंगोली येथून १ वर्ष वयाचा अश्व अडीच लाख रुपये मोजून खरेदी केला होता.
हरीषने त्याचे नाव मोठ्या प्रेमाणे ‘शिवा’ असे ठेवले. मोठ्या जिव्हाळ्याने त्याचे पालनपोषण केले. पाहता-पाहता ‘शिवा’ने कुटुंबीयांच्या मनातही घर केले.
अचानक चार दिवसांपूर्वी अश्वाची प्रकृती बिघडली अन् तेव्हापासून तो अशक्त झाला होता. अखेर बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.
शंभरावर नागरिकांच्या उपस्थितीत श्रद्धांजली
अश्व ‘शिवा’ हा गावासह परिसरात सर्वांच्याच लाडाचा होता. तो अतिशय सुंदर दिसायचा. त्यामुळे नागरिक आकर्षित व्हायचे. मात्र, त्याच्या जाण्याची वार्ता गावासह परिसरात पसरताच शेतकरी हरीषच्या घरी सर्वांनी धाव घेतली. शेतात ‘शिवा’वर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी सुमारे शंभरावर नागरिकांच्या उपस्थितीत माती देऊन श्रद्धांजली वाहण्यात आली.
तालावर धरायचा सुंदर ‘ठेका’
अश्व ‘शिवा’ विविध धार्मिक कार्यक्रम, दिंड्या, पालखी सोहळा, जयंती कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होता. तालावर चांगला ठेका धरायचा. त्यामुळे नागरिक त्याचे दिवाने होते. गावातील लोकांचा ‘शिवा’ अश्व हा आवडीचा होता. त्याच्या सुंदर नाचण्याने सर्वच अवाक् व्हायचे. मात्र, त्याच्या जाण्याने नागरिकांचेही मन गहिवरून आले.
शरीरावर होती ‘महाराजांची’ प्रतिकृती
तीन वर्षाचा अश्व ‘शिवा’च्या शरीराच्या पायावर असलेल्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती असल्याची आस्था नागरिकांमध्ये होती. त्यामुळेच शेतकरी हरीष याने त्याचे नाव ‘शिवा’ ठेवले होते. अश्वाकडे पाहिल्यावर महाराजांचे चित्र डोळ्यासमोर येत असल्याने नागरिकांनाही दर्शन होत होते, हे विशेष.
नाचण्यात पटकाविला होता दुसरा क्रमांक
आजनसरा येथील भोजाजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सव सोहळ्यात ‘शिवा’ अश्व सहभागी झाला होता. या स्पर्धेत सुमारे २२ अश्वांचा समावेश होता. या स्पर्धेत ‘शिवा’चा सुंदर ठेका पाहून तसेच नाचणे पाहून २२ अश्वांपैकी ‘शिवा’ला पसंती देत दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळवला होता. त्यामुळे हिंगणघाट तालुक्यात ‘शिवा’ अश्वाची तारीफ केली जात होती, हे विशेष.