रात्रीचा काळोख...किंकाळ्या अन् क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 05:00 IST2022-03-14T05:00:00+5:302022-03-14T05:00:21+5:30
अज्ञात वाहनाने रानडुकरांना धडक दिल्याने दोन रानडुक्कर रस्त्यावर मृतावस्थेत पडून होते. सर्वत्र काळोख असल्याने पी. बी. १० एफ.टी. ७९५२ क्रमांकाच्या चालकाला मृतावस्थेत पडलेले रानडुक्कर न दिसल्याने कार उसळली अन् रस्त्याखाली जाऊन उतरली. मागाहून दुचाकीवर येणाऱ्या चाफले कुटुंबीयाच्या हे निदर्शनास येताच त्यांनी दुचाकी थांबवून पत्नी व त्यांच्या चारवर्षीय मुलाला रस्त्याकडेला थांबवून राकेश चाफले हा मदतीसाठी धावला.

रात्रीचा काळोख...किंकाळ्या अन् क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले...
चैतन्य जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दररोजप्रमाणे रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना असे काही घडेल याची कल्पनाही नव्हती...वेळ रात्री १०.३० वाजताची...क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले...अन् रक्ताच्या थारोळ्यात तिघेही रस्त्यावर निपचित पडून दिसले...मग काय किंकाळ्या अन् हंबरडे फुटू लागले...हा अपघात वर्धा ते देवळी मार्गावर असलेल्या सेलसूरा शिवारात झाला. मागील तीन महिन्यातला हा तिसरा मोठा अपघात आहे. दोन अपघात जीवघेणे ठरलेत तर एका अपघातात कारमधील सदस्यांना गंभीर जखमा झाल्या. मात्र, हा रस्ता वाहनधारकांसाठी कर्दनकाळ बनत चालल्याचे दिसून येत आहे. शनिवारी रात्री झालेल्या या अपघातात ४ वर्षीय बालक रेहांश राकेश चाफले (रा. देवळी), नरेंद्र विश्वास जुगनाके (रा. दिघी. जि. यवतमाळ) आणि चंद्रशेखर वाट (रा. दाभा, जि. यवतमाळ) यांचा जागीच मृत्यू झाला.
अज्ञात वाहनाने रानडुकरांना धडक दिल्याने दोन रानडुक्कर रस्त्यावर मृतावस्थेत पडून होते. सर्वत्र काळोख असल्याने पी. बी. १० एफ.टी. ७९५२ क्रमांकाच्या चालकाला मृतावस्थेत पडलेले रानडुक्कर न दिसल्याने कार उसळली अन् रस्त्याखाली जाऊन उतरली. मागाहून दुचाकीवर येणाऱ्या चाफले कुटुंबीयाच्या हे निदर्शनास येताच त्यांनी दुचाकी थांबवून पत्नी व त्यांच्या चारवर्षीय मुलाला रस्त्याकडेला थांबवून राकेश चाफले हा मदतीसाठी धावला. हे पाहून काही नागरिकही थांबले. पण, ते म्हणतात ना...काळ आल्यावर कुणाचेही चालत नाही.
अवघ्या काही सेकंदातच मागाहून भरधाव येणाऱ्या एम.एच.३१ एफ.ए. २९०५ क्रमांकाच्या कारचालकालाही रानडुक्कर दिसले नसल्याने कार अनियंत्रित होऊन थेट समोर उभ्या दुचाकीवर जाऊन धडकली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर आणि पाच जण किरकोळ जखमी झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मल्हारी ताळीकोटे करीत असून एम.एच.३१ एफ.ए. २९०५ क्रमांकाच्या कार चालकाविरुद्ध सावंगी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
भदाडी नदीचा पूल ५०० मीटर लांब
- जानेवारी महिन्यात सावंगी महाविद्यालयातील सात भावी डॉक्टर बर्थडे पार्टी आटोपून परत येत असताना सेलसूरा येथील भदाडी नदीच्या पुलावरून त्यांची कार नदीत कोसळली होती. या अपघातात सातही तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. महिनाभरापूर्वी याच पुलाच्या थोडे समोर एका वाहनाचा अपघात झाला होता. पण, सुदैवाने हानी झाली नव्हती, त्यातच आता अवघ्या ५०० मीटर दूर अंतरावर झालेल्या या अपघाताने नागरिकांच्या अंगावर शहारे आणले असून समाजमन सुन्न झाले.
उपविभागीय पोलीस अधिकारी अन् ठाणेदार तातडीने पोहोचले घटनास्थळी
- अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्यासह सावंगी ठाण्यातील पोलीस निरीक्षक धनाजी जळक तसेच कर्मचाऱ्यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले तसेच जखमींना उपचारार्थ देवळी तसेच सावंगी येथील रुग्णालयात पाठविले.
वाहतूक केली सुरळीत...
- रक्ताच्या थारोळ्यात पडून असलेल्या दोन्ही रानडुकरांमुळे काही वेळ दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, पुन्हा अपघात होऊ नये, म्हणून सावंगी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी रस्त्यावर पडून असलेल्या रानडुकरांना रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून मदतकार्य
- अपघाताची माहिती मिळताच वर्धा नगरपालिकेतील अग्निशमन दलाचे कर्मचारी चेतन खंडारे, अश्विन खंडारे, मयूर सोनवणे, सिद्धार्थ मारकवडे यांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य केले.