तुळजापूर मार्गावर कार धू-धू जळाली; अन् यवतमाळचे दुधे कुटुंबीय बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2022 05:00 IST2022-03-18T05:00:00+5:302022-03-18T05:00:02+5:30
कार सेलसुरा शिवारातील पुलाजवळ आली असता कारच्या पुढील भागातून आगीचे लोळ उठत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने तातडीने वाहन थांबवून सर्वांना वाहनाबाहेर निघण्याचे सांगितले. वाहनातील सर्वच व्यक्ती बाहेर येताच आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण कारला आपल्या कवेत घेतले. भर रस्त्यात कार जळत असल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.

तुळजापूर मार्गावर कार धू-धू जळाली; अन् यवतमाळचे दुधे कुटुंबीय बचावले
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : नागपूर-तुळजापूर मार्गावर सेलसूरा शिवारात भरधाव असलेल्या कारने अचानक पेट घेतला. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी अवघ्या २० मिनिटांत ही कार धू-धू जळून कोळसा झाली.
गुरुवारी दुपारी हा अपघात झाला असून, चालकाने वाहन थांबविताच वाहनातील सर्वांनी वाहनाबाहेर पळ काढल्याने यवतमाळ येथील दुधे कुटुंबीय थोडक्यात बचावले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठून पूर्णपणे आगीच्या कवेत असलेल्या कारवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
होळीचे औचित्य साधून मुलीला गाठी-चोळी देण्याची प्रथा आहे. हीच प्रथा पूर्ण करण्यासाठी यवतमाळ येथील दुधे कुटुंबीय कारने (एम.एच.२९ बी.सी.४२५६) यवतमाळकडून वर्धेच्या दिशेने जात होते. कारमधील चालक सुनील भगत, प्रणय दुधे, जयंत दुधे, विक्की गायकवाड, संजुमाला दुधे, सतिका दुधे (सर्व रा. यवतमाळ) हे गप्पा गोष्टी करीत प्रवास करीत असतानाच कार सेलसुरा शिवारातील पुलाजवळ आली असता कारच्या पुढील भागातून आगीचे लोळ उठत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने तातडीने वाहन थांबवून सर्वांना वाहनाबाहेर निघण्याचे सांगितले.
वाहनातील सर्वच व्यक्ती बाहेर येताच आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण कारला आपल्या कवेत घेतले. भर रस्त्यात कार जळत असल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. दरम्यान, देवळीच्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच देवळीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठले. सुमारे पाऊण तासांच्या प्रयत्नाअंती आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या घटनेची नोंद सावंगी पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.