ठाणेगाव येथील संगणक चोरी प्रकरणात दोघे जेरबंद
By Admin | Updated: August 18, 2014 23:38 IST2014-08-18T23:38:23+5:302014-08-18T23:38:23+5:30
तालुक्यातील ठाणेगाव ग्रामपंचायत मधील दोन संगणकाची संशयास्पदरीत्या चोरी झाली होती. या चोरीचा शोध लावण्यात स्थानिक पोलिसांना यश आले असून गावातीलच दोघांना अटक करण्यात आली आहे.

ठाणेगाव येथील संगणक चोरी प्रकरणात दोघे जेरबंद
कांरजा (घाडगे) : तालुक्यातील ठाणेगाव ग्रामपंचायत मधील दोन संगणकाची संशयास्पदरीत्या चोरी झाली होती. या चोरीचा शोध लावण्यात स्थानिक पोलिसांना यश आले असून गावातीलच दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींजवळून मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्यात मुख्य आरोपी चंदू मांदळे (२८) तर त्याला सहकार्य करणाऱ्यात पांडुरंग भिष्णूरकर याचा समावेश आहे. हे दोघे गावातीलच आहेत.
ठाणेगाव येथील ग्रामपंचायतीच्या कुलूपबंद इमारतीतून संगणक चोरी झाले होते. यातील एक संगणक जुलै तर दुसरे डिसेंबर २०१३ मध्ये चोरीला गेले होते. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रामपंचायत कार्यालयात चोरी करताना कुठलीही तोडफोड झाली नसल्याने चोरटे गावातीलच असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. चोरी करणारा ग्रामपंचायत व्यवहाराशी संबंधीत असल्याचा संशयही व्यक्त होत होता. या संशयाच्या आधारावर ठाणेदार विनोद चौधरी यांनी चौकशी केली असता एक संगणक चंदू मांदळेच्या घरी सापडले तर दुसरे संगणक काटोलला बाजारात विकल्याची त्याने कबुली दिली. या चोरीत त्याला त्याचा मित्र पांडूरंग भिष्णूरकर याने साथ दिली. या दोघांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून न्यायालयासमोर सादर केले आहे.(तालुका प्रतिनिधी)