दारूविक्रीबाबत ठाणेदारांनी पोलीस कर्मचाऱ्यांना फटकारले
By Admin | Updated: July 31, 2014 00:11 IST2014-07-31T00:11:48+5:302014-07-31T00:11:48+5:30
स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सेलू शहरासह अन्य गावांतील दारूबंदी महिला मंडळांची झालेली वाताहत व पोलीस कर्मचाऱ्यांची अवैध वसूली यावर मंगळवारी लोकमतने वृत्त प्रकाशित केले़

दारूविक्रीबाबत ठाणेदारांनी पोलीस कर्मचाऱ्यांना फटकारले
सेलू : स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सेलू शहरासह अन्य गावांतील दारूबंदी महिला मंडळांची झालेली वाताहत व पोलीस कर्मचाऱ्यांची अवैध वसूली यावर मंगळवारी लोकमतने वृत्त प्रकाशित केले़ या वृत्तातील सर्व बाबी सत्य असल्याची खात्री होताच ठाणेदार उल्हास भूसारी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना धारेवर धरले़ शिवाय महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही खडसावले़
ठाणेदारांनी घेतलेल्या या पावित्र्यामुळे दारूविक्रीला तात्पुरता ‘ब्रेक’ लागणार आहे; पण पुन्हा सवयीचे गुलाम असलेले हे ‘अर्थकर्म’ सुरू करतील, या शंका नाही़ यामुळे एकाच ठिकाणी राहून आपले पाळेमुळे घट्ट रोवणाऱ्या बीट जमादार व त्यांच्या अधिनस्त सहकाऱ्यांना इतर बीटचा कार्यभार देऊन पोलीस ठाण्यांतर्गत अदलाबदल करणे गरजेचे आहे. काही जुन्या व काही नवीन आलेल्या कर्मचाऱ्यांना बीटनिहाय जबाबदारी देण्याची गरज निर्माण झाली आहे. ठाणेदार उल्हास भूसारी गुन्हे शाखेत होते. यामुळे पोलिसांत राहून वर्दीखाली गैरव्यवहार करणारे त्यांना कुणी सांगण्याची गरज नाही. ठाणेदारांच्याच नावाचा गैरवापर करून भरदिवसा वसुली करणारे हे कर्मचारी ठाणेदारासाठीच धोक्याची घंटा ठरत आहे़ सेलू पोलीस ठाण्यांतर्गत बीटनिहाय जमादारावर त्या-त्या भागातील गावांची जबाबदारी आहे. एकाच जमादाराकडे अनेक वर्षांपासून हे काम असल्याने त्यांनी काही दलाल पोसले आहेत़ या दलालांच्या माध्यमातून राईचा पर्वत करून नागरिकांना त्रास द्यायचा, दमदाटी करायची व अर्थपूर्ण व्यवहार करायचा, असे समीकरण घट्ट केले़ यामुळे गुन्हेगार व अवैध व्यावसायिक वाढले असून निरपराधांना बळीचे बकरे करण्याच्या घटना वाढत आहेत़ अदखलपात्र गुन्ह्यांच्या तपास तंटामुक्तीच्या संबंधितांकडे सोपवून आपसात समेट घडविण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. अदखलपात्र गुन्ह्यांत ब्लॅकमेल करण्याचे प्रमाण सर्वाधिक होत असल्याचे दिसते़
ठाणेदार भूसारी यांच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोण सकारात्मक आहे. यामुळे त्यांनी सर्व बीटचे जमादार त्वरित कार्यमुक्त करून त्यांच्या जागेवर नव्याने आलेले व जुण्यापैकी काही चांगले चेहरे देणे गरजेचे आहे. काही वसुली करणाऱ्यांची उचलबांगडी करून त्यांची मालगुजारी संपुष्टात आणावी, अशी मागणी सामान्यांच्यावतीने करण्यात येत आहे़ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़(तालुका प्रतिनिधी)