निर्मल ग्राम योजना उद्दिष्टाला हरताळ
By Admin | Updated: July 31, 2014 00:12 IST2014-07-31T00:12:08+5:302014-07-31T00:12:08+5:30
हागणदारीमुक्त गाव योजनेसाठी शासन कोट्यावधी रुपये खर्च करीत असले तरी प्रत्यक्षात ही योजना कागदावरच राबविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त

निर्मल ग्राम योजना उद्दिष्टाला हरताळ
विरुळ(आकाजी) : हागणदारीमुक्त गाव योजनेसाठी शासन कोट्यावधी रुपये खर्च करीत असले तरी प्रत्यक्षात ही योजना कागदावरच राबविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त गावातील नागरिकच उघड्यावरच शौचास बसत असल्याने या योजनेच्या उद्दिष्टालाच हरताळ फासल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे.
स्वच्छतेकडून समृद्धीकडे हा मूलमंत्र प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी हागणदारीमुक्त गाव ही संकल्पना पुढे आली. ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी शासनाने निर्मलग्राम योजना सुरू केली. या योजनेवर कोट्यावधी रुपये खर्च केले. परंतु ही योजना प्रत्यक्षात न उतरता केवळ कागदावर राहिली. ग्रामस्वच्छता अभियानात गावकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असावा म्हणून अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. पारितोषिकही जाहीर करण्यात आले. परंतु केवळ पुरस्कार आणि स्तुतिसुमने स्वीकारण्यासाठी योजनेचा उपयोग झाला. पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावरील तपासणी पथकाने भेटी दिल्या तेव्हा प्रत्यक्ष गावाची पाहणी न करता या पथकांतील अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यातच गावकऱ्यांनी धन्यता मानली. आर्वी तालुक्यातही पुरस्कार प्राप्त गावाची हीच स्थिती आहे. या योजनेची पुरती वाट लागली असून पुरस्कार प्राप्त गावातील नागरिक गावाबाहेर जाणाऱ्या रस्त्यावर शौचास बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गावात शिरताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.(वार्ताहर)