Ten vehicles seized in action | कारवाईचा धडाका दहा वाहने जप्त

कारवाईचा धडाका दहा वाहने जप्त

ठळक मुद्देगौण खनिजाची अवैध वाहतूक : तहसीलदारांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/सेलू : वर्धा, सेलू व देवळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन होत असल्याने महसूल विभागाने कारवाईचा धडाका सुरु केला आहे. देवळी तालुक्यात वाळू घाटावर कारवाई करीत वाहनांसह बोट जप्त करण्यात आली. तर सेलू व वर्धा तलसीलदारांनी गौणखनिजांची वाहतूक करणारे दहा ट्रक जप्त केले आहे. त्यामुळे वाळू व गौणखनिज चोरट्यांचे धाबे दणाणले आहे.
वर्ध्याचे उपविभागीय अधिकारी बगळे यांच्या मार्गदर्शनात वर्धा येथील तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनी मदनी (दिंदोडा) परिसरातून मुरुमांची अवैध वाहतूक करणारे चार ट्रक जप्त केले आहे. चारही ट्रक डी. पी. जैन कंपनीचे असून त्यांचे क्रमांक एम. एच. ४०-डी. जे. ११२९, एम. एच. ४० - बी. जी. ११२७, एम. एच. ४० -ऐ. के. ६६३६ व एम. एच.३१ सि.क्यू. ७०११ असे आहे. या ट्रकमध्ये २० ब्रास मुरुम आढळून आल्याने ४ लाख ३० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. यासोबतच सेलुचे तहसीलदार महेंद्र सोनोने यांनीही कोपरा-हमदापूर शिवारातून मुरुमाची अवैध वाहतूक करणारे सहा ट्रक जप्त केले आहे. या ट्रकचे क्रमांक जे.एच.१४-डि.डि.०४१०, एम.एच.१२-ई.एफ. ४२१२, एम.एच.१२-आर.एन.१६९८, टि.एन.६६-ई-८०२३, सी.जी.१९-एच.०९४१ प ओ.डी. ३०-१९२१ असे आहेत. ही सहाही ट्रक पाटील कंस्ट्रक्शनच्या मालकीचे असल्याचे तहसीलदार सोनोने यांनी सांगितले आहे. या कारवाईतील ट्रकवर कितीचा दंड आकारण्यात आला, याची माहिती देण्यास नकार दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अखेर गुंजखेडा घाटातून बोटी जप्त
देवळीचे तहसीलदार गुंजखेडा घाटात कारवाई करुन एक ट्रॅक्टर व दहा ब्रास वाळूसाठा जप्त केला होता. परंतू घाटातील बोट अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत पळून गेली होती. त्यामुळे ट्रक्टर पुलगाव पोलीस ठाण्यात उभा करुन बोट ताब्यात द्या अन्यथा गुन्हा दाखल करणार, असा इशारा दिला होता. शेवटी सोमवारी तहसीलदार राजेंद्र सरवदे, नायब तहसीलदार राठोड व मंडळ अधिकारी दुबे यांनी गुंजखेडा घाटातील सर्वे क्रमांक ४ मधून बोट जप्त केली. पुलगावच्या नायब तहसीलदार कार्यालयात बोट उभी करण्यात आली आहे. या बोटीचा मालक अद्यापही स्पष्ट झाला नाही. त्यामुळे याबाबत अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला असून जर मालकीहक्क कोणी सांगितला नाही तर या बोटीचा लिलाव करणार असल्याचे तहसीलदार राजेंद्र सरवदे यांनी सांगितले.

Web Title: Ten vehicles seized in action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.