Tell me, where is the embargo in the city? | सांगा कुठे आहे शहरात दारुबंदी?

सांगा कुठे आहे शहरात दारुबंदी?

ठळक मुद्देकुठे बसा अन् खुशाल ढोसा : ठिकठिकाणी दारूची चोरटी विक्री, काहींकडून दारुची होम डिलिव्हरी

चैतन्य जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : उघड्यावरच दारुविक्री अन् त्याच ठिकाणी खुशाल ढोसणाऱ्या तळीरामांचा गोतावळा शहरातील विविध चौकांमध्ये सुरु आहे. दारूबंदी जिल्ह्यात बिनधास्तपणे दारुची विक्री सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आला आहे. उघडपणे कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असले तरी त्याकडे पोलिसांचे मात्र, दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
वर्धा जिल्ह्यात १९७४ मध्ये पूर्णत: दारुबंदी करण्यात आली. दररोज किरकोळ कारणावरुन वाद, हाणामारी त्यातूनच मोठ्या घटना झाल्याचे वर्धेकरांसाठी नवीन नाही. अशा परिस्थितीत पोलिसांच्या नाकावर टिचून शहरात उघड्यावरच बेकायदीशररीत्या दारुविक्री आणि तेथेच खुशाल दारु ढोसण्याचा प्रकार लोकमतने उघडकीस आणला आहे. वाढत्या गुन्हेगारीत शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. मात्र, या प्रकारामुळे शहरात मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अवैध दारुविक्री तसेच अवैध दारु व्यावसायिकांवर आळा बसावा यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असले तरी जिल्ह्यात सर्वत्र अवैध दारुविक्री फोफावत असल्याचे चित्र आहे.
दारुमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असताना दारुबंदी जिल्ह्यात सुरु असलेली दारुविक्री उठविण्यात पोलीस विभाग अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. शहरात दारुचे पाट वाहत आहेत. पोलीस कारवाई करतात असेही सांगितले जाते, मग जिल्ह्यात दारुचा हा माहापूर कसा? असा सवाल विचारण्यात येत आहे.

असे केले ‘स्टिंग ऑपरेशन’
मागील दोन दिवसांपासून लोकमत चमूने दुपारी व सायंकाळी शहरातील काही चौकांचा आढावा घेतला. यावेळी प्रामुख्याने पानटपऱ्यांवर, हॉटेलमध्ये तसेच आम्लेट पावच्या गाड्यांवर तळीरामांचा गोतावळा दिसून आला. काही ठिकाणी दारु उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार बॅचलर रोड, आर्वी नाका, झोपडपट्टी, तुकाराम वॉर्ड, सिंदी (मेघे), शास्त्री चौक, इतवारा परिसर, महादेवपुरा,हवालदारपुरा, मालगुजारीपुरा, धंतोली चौक, इंदिरा मार्केट परिसर, स्टेशनफैल, पुलफैल, इंदिरानगर परिसर येथे खुलेआम दारुविक्री सुरु असल्याचे दिसून आले.

‘अन्’ हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे
खुलेआम सुरु असलेली दारुविक्री आणि तळीरामांची होणारी गर्दी , ही स्थिती ज्या चौकांमध्ये आहे.
त्या ठिकाणांपासून हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे आहेत. शिवाय पोलीस अधीक्षक कार्यालया नजीकच हा प्रकार घडत आहे. असे असले तरी, याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

काय म्हणतो कायदा?
मुंबई दारुबंदी अ‍ॅक्टनुसार, सार्वजनिक ठिकाणी दारुविक्री आणि दारु पिण्यास बंदी आहे. असे करणाºयांना तीन वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

Web Title: Tell me, where is the embargo in the city?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.