सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? शेतकऱ्यांची वाढली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 05:00 IST2021-07-04T05:00:00+5:302021-07-04T05:00:16+5:30

येत्या आठ दिवसांत जिल्ह्यात दमदार पाऊस न पडल्यास अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. यंदाच्या वर्षी किमान १ लाख १० हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी मध्यंतरी झालेल्या पावसादरम्यान पेरणीची कामे आटोपली. तर सध्या सोयाबीन पिकाची वाढ किमान सहा इंचापर्यंत झाली आहे. असे असले तरी सध्या सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

Tell me, Bholanath, will it rain? Increased concern of farmers | सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? शेतकऱ्यांची वाढली चिंता

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? शेतकऱ्यांची वाढली चिंता

ठळक मुद्देजिल्ह्यात ९० टक्के पेरण्या पूर्ण; पण वरुणराजा देतोय हुलकावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीन, तूर, कपाशीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असून आतापर्यंत जिल्ह्यात ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शिवाय पीकही अंकुरले आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून पाऊसच बेपत्ता झाल्याने ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय’ असे म्हणण्याची वेळ सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. येत्या आठ दिवसांत जिल्ह्यात दमदार पाऊस न पडल्यास अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. यंदाच्या वर्षी किमान १ लाख १० हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी मध्यंतरी झालेल्या पावसादरम्यान पेरणीची कामे आटोपली. तर सध्या सोयाबीन पिकाची वाढ किमान सहा इंचापर्यंत झाली आहे. असे असले तरी सध्या सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या समस्येला तोंड देत असतानाच जिल्ह्यात पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, असे शेतकरी अंकुरलेल्या पिकाला पाणी देऊन पिकाचे संगोपन करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. तर ज्याच्याकडे सिंचनाची व्यवस्था नाही अशा शेतकऱ्यांच्या नजरा सध्या आकाशाकडे लागल्या आहेत. 

आठ दिवस पाऊस न आल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट अटळ
- जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २२९.२४ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाला असून, येत्या आठ दिवसांत जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावेल असे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. सध्या अंकुरलेल्या सोयाबीन पिकाची उंची सहा इंचापर्यंत आहे. परंतु, काही भागातील सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसताे. त्यामुळे कृषी विभाग जिल्ह्यात खोडमाशी निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबविणार आहे. आठ दिवसांत दमदार पाऊस झाल्यास उभ्या पिकांना नवसंजीवनी मिळेल.
- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.
 

देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो

मागील काही दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. शिवाय सध्या ऊन तापत आहे. यामुळे याचा विपरीत परिणाम उभ्या पिकावर होत आहे. येत्या आठ दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावेल अशी परिस्थिती सध्या आहे.
- संजय वाकडे,                                                 शेतकरी, नांदोरा.
 

वघाळा परिसरात सोयाबीन, तूर व कपाशीचे उत्पन्न शेतकरी घेतात. या भागात बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली आहेत. पण सध्या पाऊस बेपत्ता झाल्याने अडचणीत भर पडली आहे. रुसलेला वरुणराजा वेळीच प्रसन्न होऊन जिल्ह्यात बरसला पाहिजे. अन्यता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येईल.
- गजानन जिकार, शेतकरी, वघाळा.

सोयाबीनचा पेरा वाढला
मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. नेमका किती हेक्टरने यंदा सोयाबीनचा पेरा वाढला हे कृषी विभागाच्या अंतिम खरीप पीक पेरा अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. यंदा १.१० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होईल असा अंदाज कृषी विभागाचा आहे.

 

Web Title: Tell me, Bholanath, will it rain? Increased concern of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.