विद्यार्थ्यांची ज्ञानलालसा शमविणे शिक्षकांचे आद्यकर्तव्य
By Admin | Updated: July 29, 2014 23:59 IST2014-07-29T23:59:15+5:302014-07-29T23:59:15+5:30
बदलत्या काळानुसार ज्ञान आणि तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत आहे. कालचे ज्ञान आज काळाच्या कसोटीवर जुनाट ठरत आहे. क्षणाक्षणाला तंत्रज्ञान बदलत असून नव्या पिढीची ज्ञानलालसा वेगाने वाढत आहे.

विद्यार्थ्यांची ज्ञानलालसा शमविणे शिक्षकांचे आद्यकर्तव्य
वर्धा : बदलत्या काळानुसार ज्ञान आणि तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत आहे. कालचे ज्ञान आज काळाच्या कसोटीवर जुनाट ठरत आहे. क्षणाक्षणाला तंत्रज्ञान बदलत असून नव्या पिढीची ज्ञानलालसा वेगाने वाढत आहे. ही ज्ञानसंपदानाची भूक शमविण्यासाठी शिक्षकांनी तत्पर राहून आणि उपलब्ध साधनांचा योग्य वापर करुन ज्ञानदानाच्या कसोटीवर स्वत:ला सिद्ध करावे, असे आवाहन दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप गोडे यांनी केले.
सालोड(हिरापूर) येथील महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाच्या रचना शारीर विभागात आयोजित राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
भारत सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, आयुष विभाग, राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आणि महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व अनुसंधान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही सहा दिवसीय कार्यशाळा पार पडली. उद्घाटन समारोहाला मार्गदर्शक म्हणून डॉ. दिनकर थत्ते, डॉ. नीलम गुप्ता, संस्थेचे कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य व वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्याम भुतडा, समन्वयक व्ही. आर. मेघे, उपप्राचार्य व रचना शारीर विभागप्रमुख डॉ. प्रीती देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यशाळेत डॉ. थत्ते, डॉ. गुप्ता यांच्यासह कर्नाटक येथील डॉ. गिरीधर कंठी, डॉ. एन. मुरलीधरा, डॉ. बी. जी. कुलकर्णी, डॉ. सुधीरकुमार, डॉ. दिनकर शर्मा तसेच डॉ. मुकुंद एरंडे, डॉ. सरोज पाटील, डॉ. संयुक्ता गोखले, डॉ. भूषण लाखकर, डॉ. प्रीती देसाई या तज्ज्ञांनी उपस्थित शिक्षक प्रतिनिधीशी संवाद साधला.
कार्यशाळेला महाराष्ट्रासह तामिळनाडू, कर्नाटक, उत्तरप्रदेश, हरियाणा, केरळ, उत्तराखंड, गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली येथील शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रतिनिधींनी महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभागांना भेट माहिते घेतली. या सहा दिवसीय कार्यशाळेत रचना शारीर विषयातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी प्र्राप्त झाल्याने अद्यावत अभ्यासक्रमाबाबत नवी दिशा व दृष्टी मिळाली, असा अभिप्राय या प्रतिनिधींनी व्यक्त केला.
या कार्यशाळेकरिता रचना शारीर विभागाचे डॉ. सचिन खेडीकर, डॉ. गौरव सावरकर, डॉ. उमेश येळणे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)