शिक्षक दिनावर जि.प. शिक्षण विभागाच्या गोंधळाचे सावट
By Admin | Updated: August 26, 2015 02:11 IST2015-08-26T02:11:24+5:302015-08-26T02:11:24+5:30
शिक्षकांकरिता महत्त्वाचा असलेला शिक्षक दिन आठवड्यावर आला आहे. यात जिल्हा परिषदेच्यावतीने या दिनाकरिता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते;...

शिक्षक दिनावर जि.प. शिक्षण विभागाच्या गोंधळाचे सावट
शिक्षक पुरस्काराबाबत अद्याप बैठक नाही : सर्वत्र बदली व नियुक्तीच्या वादाची चर्चा
वर्धा : शिक्षकांकरिता महत्त्वाचा असलेला शिक्षक दिन आठवड्यावर आला आहे. यात जिल्हा परिषदेच्यावतीने या दिनाकरिता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते; मात्र यंदाच्या सत्रात या दिनाला जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या घोळाचे ग्रहण लागल्याचे दिसते. आठवड्यावर आलेल्या शिक्षक दिनाकरिता अद्याप जिल्हा परिषदेत एकही बैठक झाली नसल्याची माहिती आहे.
शिक्षक दिनी जिल्हा परिषदेच्या शाळांत कार्यरत असलेल्या काही शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून पुरस्कार देण्यात येतो. याकरिता त्यांना प्रस्ताव सादर करण्याची आजपर्यंतची प्रथा आहे. यंदा मात्र शिक्षकांना पुरस्कार देण्याकरिता प्रस्ताव न मागविता त्या भागातील गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांची माहिती गोळा करून यातील निवडक शिक्षकांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे शिक्षण सभापतींनी जाहीर केले होते. त्यांच्या सांगण्यानुसार गटशिक्षणाधिकारी कामाला लागले; मात्र जिल्हा स्तरावर या संदर्भात कुठलीही बैठक झाली नसल्याने यंदा शिक्षकाना पुरस्कार मिळतील अथवा नाही या बाबत शंका निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदेत सर्व शिक्षा अभियानांतर्गत समाावेशित शिक्षकांच्या नियुक्तीत शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या उत्तरपत्रिका बदलविण्याच्या कारभारामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली. यातून सुटका करण्याकरिता त्यांना फरार राहून अटकपूर्व जामीन मिळवावा लागला. या सर्व प्रकारात काही दिवसांवर असलेल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाकरिता शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र जि.प. दिसून येत आहे.(प्रतिनिधी)