पंचायत समितीला ताडपत्रीचा आधार
By Admin | Updated: July 21, 2014 00:20 IST2014-07-21T00:20:13+5:302014-07-21T00:20:13+5:30
तालुक्याचे ठिकाण असलेल्या सेलू येथील शासकीय कार्यालयांच्या इमारतींवर अवकळा आली आहे़ पावसाळ्यातही ही स्थिती कायमच दिसते़ यामुळेच सध्या येथील पंचायत समिती कार्यालयास

पंचायत समितीला ताडपत्रीचा आधार
घोराड : तालुक्याचे ठिकाण असलेल्या सेलू येथील शासकीय कार्यालयांच्या इमारतींवर अवकळा आली आहे़ पावसाळ्यातही ही स्थिती कायमच दिसते़ यामुळेच सध्या येथील पंचायत समिती कार्यालयास गळती थांबविण्यासाठी ताडपत्रीचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसते़ शासकीय कार्यालयाची ही दुरवस्था पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे़
मंगळवारी आलेल्या साधारण पावसाने पंचायत समिती कार्यालयातील लेखा, पंचायत, आस्थापणा, एमआरजीएस कृषी या एकाच इमारतीत असलेल्या विभागात पाणी गळू लागल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. संगणक सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. याबाबतचे वृत्त लोकमतने गुरूवारी प्रकाशित केले. यानंतर शुक्रवारी पंचायत समितीने या इमारतीच्या कवेलूच्या छतावर ताडपत्री टाकून तात्पुरती का होईना, पाणी गळती थांबविली; पण ६३ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ११० गावांचा कारभार पाहणाऱ्या व लाखो रुपयांची विकास कामे गावात करणाऱ्या पं़स़ ला कायमस्वरुपी उपायोजनेसाठी निधी नसावा वा कार्यालयाची देखभाल दुरुस्ती वेळोवेळी करण्याचा विसर पडावा, हे एक कोडेच आहे.
लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार पाहाणाऱ्या पंचायत समितीवर गरीबी दाखविण्याची वेळ आली आहे़ ५२ वर्षे जुनी व जीर्ण झालेल्या इमारतीतून गाडा चालविला जात आहे. माकडाच्या हैदोसाने जुने कवेलू फुटले आहेत़ तालुक्यातील ग्रा़पं़ च्या इमारतीवरून कवेलू दिसेणासे झाले असताना पं़स़ कार्यालयावर आजही कवेलूचे छत दिसते़ राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या तालुक्यातील राजकीय नेत्यांचे कसब यावरून दिसते़ नवीन इमारतीचा प्रस्ताव झाला असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याचा पाठपुरावा का केला जात नाही, हा संशोधनाचा आहे. तात्पुरती व्यवस्था केली असली तरी पावसाने ताडपत्री ओली झाल्यावर ऊन्ह तापल्यास त्या ताडपत्रीचे तुकडे होतात़ यामुळे ही ताडपत्री किती दिवस टिकणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे़
परिसरात एकेकाळी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानातून तीन विभागाचा कारभार पाहिला जात आहे़ यात शिक्षण, एकात्मिक बाल विकास व पशुधन विभागाच्या कार्यालयावरील कवेलू फुटले आहेत़ मुसळधार पाऊस आल्यास या कार्यालयांतही पाणी गळणार आहे़ शासकीय कार्यालयांना पाणी गळू नये म्हणून ताडपत्रीचा वापर करण्याची वेळ येत असेल तर यापेक्षा दुर्भाग्य कोणते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ कित्येक वर्षांपासून दुरवस्थेतील इमारतींच्या डाडगुजी व दुरूस्तीकडे मात्र कुणीही लक्ष देत नसल्याचे दिसते़(वार्ताहर)