माथा ते पायथा संकल्पनेनुसार जलयुक्त शिवारची कामे घ्या
By Admin | Updated: October 8, 2015 01:50 IST2015-10-08T01:50:24+5:302015-10-08T01:50:24+5:30
जलयुक्त शिवार अभियानामध्ये गावांची निवड करताना पाण्याची आवश्यकता व उपलब्ध पाणी याचा अभ्यास करा.

माथा ते पायथा संकल्पनेनुसार जलयुक्त शिवारची कामे घ्या
आशुतोष सलील : कमी खर्चात अधिक जलसाठा, गावस्तरावरील आराखड्यांची पाहणी
वर्धा : जलयुक्त शिवार अभियानामध्ये गावांची निवड करताना पाण्याची आवश्यकता व उपलब्ध पाणी याचा अभ्यास करा. प्रत्येक नाला हा माथा ते पायथा या संकल्पनेनुसार अडवून गावाचे शिवार जलयुक्त करण्यास प्राधान्य द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिल्या.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुसऱ्या टप्प्यात गावांच्या निवडीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, अपर मुख्य कार्र्यपालन अधिकारी प्रमोद पवार, जलतज्ञ मनोहर सोमनाथे, माधव कोटस्थाने आदी उपस्थित होते.
जलयुक्त शिवारामध्ये कमी खर्चात अधिकाधिक जलसाठे निर्माण होतील या दृष्टीने सिमेंट नालाबांध वा गाव तलावाच्या दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य द्यावे. नवीन कामे घेताना माथा ते पायथा या संकल्पनेनुसार पाण्याची उपलब्धता बाराही महिने होईल, असे नवीन व दुरूस्तीची कामे घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या. प्रत्येक गावात जलयुक्त शिवार कार्यक्रम राबविताना गाव आराखडा हा परिपूर्ण असावा या दृष्टीने अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे. जिल्हाधिकारी समिती प्रत्येक तालुका स्तरावर याबाबत आढावा घेऊनच पुढील कार्यक्रम निश्चित करेल, अशी सूचनाही जिल्हाधिकारी सलील यांनी दिल्या.
जलयुक्त शिवारांतर्गत झालेल्या प्रत्येक कामांवर जनावरांसाठी चारा उपलब्ध होईल यादृष्टीने चाऱ्याच्या जाती पशुसंवर्धन विभागातर्फे लावण्यात येणार आहे. पावसाळा संपत असताना नाल्यातून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्यात येणार आहे. यासाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन महाजन यांनी नियोजन व कार्यक्रम तयार करावा, अशी सूचना त्यांनी केली. जयलयुक्त शिवार कार्यक्रमात गाव स्तरावर जलसाठे निर्माण करताना त्याच्या योग्य वापरासाठी ग्रामस्तरावर पाणी वापर संस्था निर्माण करण्यात येऊन अशा संस्थांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे सांगितले.
यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिना, जलतज्ञ मनोहर सोमनाथे, माधव कोटस्थाने, प्रमोद पवार, नाबार्डच्या स्रेहलता बनसोड, आर.जी. वाहने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी र्ईलमे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू, कार्यकारी अभियंता ढवळे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक प्रवीण बडगे, वन अधिकारी आदींसह सदस्यांनी उपयुक्त सूचना केल्या. प्रारंभी भारती यांनी अभियातील कामांची व नियोजनाबाबत माहिती दिली.(कार्यालय प्रतिनिधी)