सहायक आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST2020-06-10T05:00:00+5:302020-06-10T05:00:25+5:30

गोपालकांची ओरड आणि लोकमतच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या माहितीअंती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगणमताने सुरु असलेला पशुसंवर्धन विभागातील भोेंगळकारभार चव्हाट्यावर आला आहे. देवळी येथील सहायक आयुक्त डॉ. सुहास अलोणे आणि कांरजा (घाडगे) येथील सहायक आयुक्त डॉ. मोहन खंडारे हे मुख्यालयी राहात नसल्याचे निदर्शनास आले.

Take disciplinary action against the Assistant Commissioner | सहायक आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई करा

सहायक आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई करा

ठळक मुद्देगोपालकांची मागणी : मुख्यालयी दांडी मारून स्वगृही मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले होते. तरीही ज्यांनी मुख्यालयाकडे पाठ फिरविली त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन त्यांच्या विनावेतन रजा मंजूर करव्यात, असे शासनाचे आदेश आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात मुख्यालयी नसलेल्या देवळी व कारंजा (घाडगे) येथील तालुका पशुचिकित्सालयाचे सहायक आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गोपालकांकडून होत आहे.
गोपालकांची ओरड आणि लोकमतच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या माहितीअंती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगणमताने सुरु असलेला पशुसंवर्धन विभागातील भोेंगळकारभार चव्हाट्यावर आला आहे. देवळी येथील सहायक आयुक्त डॉ. सुहास अलोणे आणि कांरजा (घाडगे) येथील सहायक आयुक्त डॉ. मोहन खंडारे हे मुख्यालयी राहात नसल्याचे निदर्शनास आले.
या दोन्ही अधिकाऱ्यांना जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. राजीव भोजने व प्रादेशिक पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. किशोर कुमरे यांचे पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांचे चांगलेच फावते असल्याने मनमानी कारभार सुरु आहे. त्यांनी मुख्यालयी न राहता कोरोनाबाधित जिल्ह्यातून अवागमन करुन साथरोग प्रतिबंधक कायद्याचेही उल्लंघन केल्याची माहिती पुढे आली आहे.
त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांची तसेच त्यांची पाठराखन करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी होत आहे.

यात किती सत्यता?
देवळीचे सहायक आयुक्त डॉ. सुहास अलोणे हे येथे रुजू झाल्यापासून यवतमाळातून अधून-मधून ये-जा करतात. लॉकडाऊनच्या कालावधीत ते देवळीत नव्हते, असे निदर्शनास आले आहे. पण, जिल्हा उपायुक्त डॉ. भोजने यांनी ते देवळीत होते, असे सांगितले. मात्र, मुख्यालयी राहतात याचा पत्ता नाही. यवतमाळातून अधून-मधून येत असल्याने क्वारंटाईन होणे अपेक्षित होते पण, तसेही केले नाहीत.
कारंजा (घाडगे) येथील सहायक आयुक्त डॉ.मोहन खंडारे हे सुद्धा मुख्यालयी नव्हते. ते नागपुरात वास्तव्यास असतात. गेल्या महिन्याभऱ्यापासून ते वैद्यकीय रजेवर असून त्यांनी रजा वाढविल्या आहे. त्यांना मधुमेहाचा त्रास आहे, असे प्रादेशिक पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. किशोर कुमरे यांनी सांगितले. तर डॉ. खंडारे यांचा माझ्याकडे अर्ज नसून ते त्यांना रक्तदाबाचा त्रास असल्याने ते वैद्यकीय रजेवर आहे. पण, त्यांनी रजा वाढविली की काय? याची माहिती नसल्याचे जिल्हा उपायुक्त भोजने यांनी सांगितले. त्यामुळे यात किती सत्यता आहे, याची चौकशी करण्याची गरज आहे.

पालकमंत्री लक्ष देतील काय?
पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे मंत्री सुनील केदार हे जिल्ह्याचे पालकमंत्री असून त्यांच्याच जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकाºयांचा मनमर्जी कारभार सुरू आहे. त्यामुळे त्यांनी याकडे लक्ष देत सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देवळी व कारंजा तालुक्यातील पशुपालकांकडून होत आहे.

Web Title: Take disciplinary action against the Assistant Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य