विविध मागण्यांसाठी नर्सरी कामगारांचे धरणे
By Admin | Updated: January 27, 2015 23:39 IST2015-01-27T23:39:07+5:302015-01-27T23:39:07+5:30
जिल्ह्यातील कृषी विभाग अंतर्गत फळरोपवाटिका, टी.सी.डी. फार्म व बीजगुणन केंद्रावर कामगार गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. परंतु कामगारांचे वेतन वेळेवर केले जात नाही.

विविध मागण्यांसाठी नर्सरी कामगारांचे धरणे
वर्धा : जिल्ह्यातील कृषी विभाग अंतर्गत फळरोपवाटिका, टी.सी.डी. फार्म व बीजगुणन केंद्रावर कामगार गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. परंतु कामगारांचे वेतन वेळेवर केले जात नाही. तसेच जुन्या कामगारांना डावलून नव्या कामगारांना कामावर घेणे सुरू आहे. त्यामुळे याविरोधात सेंटर आॅफ इंडियन टे्रड युनियन अंतर्गत कामगारांच्या वतीने धरने देण्यात आली.
जांब नर्सरीवरील कामगारांचे एप्रिल ते डिसेंबर २०१४, बोर नर्सरीवरील कामगारांचे एप्रिल ते जुलै २०१४, नाचणगाव फार्मवरील कामगारांचे जुलै ते डिसेंबर २०१४ पर्यंतचे वेतन प्रलंबित आहे. सेलू नर्सरीवरील कामगारांचीही तीच अवस्था आहे. त्यामुळे संबंधित कामगार आर्थिक अडचणीत आले आहे. जिल्ह्यातील कृषी फार्मवरील कामगारांची ज्येष्ठता सूची तयार करण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु अद्यापपर्यंत त्याची अमंलबजावणी करण्यात आली नाही. जुन्या कामगारांना जाणीवपूर्वक डावळून नवीन कामगारांना कामावर ठेवण्यात येत आहे. फळरोपवाटिका, टीसीडी फार्म व बीजगुणन आदी ठिकाणी कार्यरत कामगारांना रोजगार हमीच्या दरानुसार मजुरी दिली जाते. शासन निर्णय क्र- २०१४/प्र.क़ १५ /म.गांधी रोजगार योजना २६ फेब्रुवारी २०१४ नुसार सुधारित दर १६७ रुपये एप्रिल २०१४ पासून लागू झालेले आहेत. परंतु त्याची अमंलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे कामगारांचे पगार लवकरात लवकर द्यावे तसेच जुन्या कामागारांना कामापासून वंचित ठेण्याचा प्रकार बंद करावा या मागणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.(शहर प्रतिनिधी)