जलतरण तलावाचा नफा पालिकेत जमाच नाही
By Admin | Updated: August 23, 2014 02:00 IST2014-08-23T02:00:25+5:302014-08-23T02:00:25+5:30
सिव्हिल लाईन परिसरात पालिकेच्या मालकीचा जलतरण तलाव हा आॅगस्ट २०१० पासून एका कंत्राटानुसार खाजगी कंपनीला देण्यात आले.

जलतरण तलावाचा नफा पालिकेत जमाच नाही
रूपेश खैरी वर्धा
सिव्हिल लाईन परिसरात पालिकेच्या मालकीचा जलतरण तलाव हा आॅगस्ट २०१० पासून एका कंत्राटानुसार खाजगी कंपनीला देण्यात आले. या कंत्राटानुसार झालेल्या नफ्यातील ६० टक्के रक्कम पालिकेला व उर्वरीत ४० टक्के रक्कम कंत्राटदाराला मिळणार होती. सन २०१२-१३ मध्ये तलावाचा निव्वळ नफा २ लाख ८३ हजार ११९ रुपये झाल्याचे दर्शविले आहे. मात्र या नफ्यातील नगरपरिषदेचा ६० टक्के वाटा म्हणजेच १ लाख ६९ हजार ८७१ रुपये पालिकेच्या निधीत जमा करण्यात आला नसल्याचे अंकेक्षण अहवाल सांगतो. यामुळे सदर रक्कम पालिकेला मिळाली किंवा अणखी कुठे गेली याबाबत संभ्रम निर्माण होत आहे.
जलतरण तलाव कंत्राटावर दिल्यानंतर १ मे २०१२ ते ३१ मार्च २०१३ या कालावधीत पालिकेचे अंकेक्षण झाले. यात या कंत्राटात अनेक त्रुट्या असल्याचा ठपका अंकेक्षकांनी ठेवला आहे. करार करताना मिळणाऱ्या उत्पन्नातून कंत्राटदाराने कोणत्या बाबीकरिता किती खर्च करायचा आहे, याचे निश्चित मानक ठरविले नाही. करारनामा करताना सनातन वित्तव्यवस्थेची स्थूल तत्वे लक्षात घेतली नाहीत. यामुळे या करारातून लाभ पालिकेला वा कंत्राटदाराला असा संशय व्यक्त होत आहे. कंत्राटदाराने देवपुजेसाठी हार पुजेच्या साहित्याकरिता पाच हजार ८७३ रुपयांचा खर्च दाखविला तर ज्यूस पिण्याकरिता चार हजार १८५ रुपये दाखविला आहे. हा खर्च कंत्राटदाराला त्याला मिळणाऱ्या नफ्यातून करायचा होता. एकूण जमा होणाऱ्या रकमेतून हा खर्च करता येत नसतानाही तो करण्यात आला.
जलतरण तलावाच्या देखभाल दुरूस्तीकरिता कंत्राटदाराने दोन लाख ५८२ रुपययांचा खर्च केला. हा खर्च करताना करारनाम्यातील अट क्रमांक ७ नुसार हा खर्च पालिकेला कळविणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. शिवाय काम करण्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या नाहीत. तलावाच्या वॉटरप्रुफिंगकरिता एक लाख २५ हजार रुपयांचा खर्च झाल्याचे नमुद आहे; मात्र हा खर्च करताना कुठलेही प्राकलन, मोजमाप वा मूल्यांकन झाल्याची नोंद नाही. यामुळे कोणत्या कामाकरिता किती रक्कम वापरल्या गेली अथवा काम झालेच नाही असे अनेक संशय बळावत आहेत. सोबतच फिल्टर प्लँट मेंटनन्सकरिता चार लाख ७४ हजार रुपयांचा खर्च केल्याचे नमुद आहे; परंतु या रकमेत कोणते काम केले याचा उल्लेख नाही. यामुळे पालिकेत झालेल्या कामांत गौडबंगाल झाल्याचा संशय बळावत आहे.