‘घाम बापाचा घरी येतो, मग घरी भाकरी होते’तून जीवनानुभवांचे कथन

By Admin | Updated: January 31, 2015 23:25 IST2015-01-31T23:25:44+5:302015-01-31T23:25:44+5:30

‘दु:ख जेव्हा भरजरी होते, तू दिल्याची खातरी होते, जीवनाने शिकविले मजला, जखम जखमेने बरी होते, घाम बापाचा घरी येतो, मग, घरी भाकरी होते’ असा जीवनानुभव गझलेतून सादर करीत

'Swaminathan's statement comes from father's house, then life is bread.' | ‘घाम बापाचा घरी येतो, मग घरी भाकरी होते’तून जीवनानुभवांचे कथन

‘घाम बापाचा घरी येतो, मग घरी भाकरी होते’तून जीवनानुभवांचे कथन

वर्धा : ‘दु:ख जेव्हा भरजरी होते, तू दिल्याची खातरी होते, जीवनाने शिकविले मजला, जखम जखमेने बरी होते, घाम बापाचा घरी येतो, मग, घरी भाकरी होते’ असा जीवनानुभव गझलेतून सादर करीत ‘नि:शब्द देव’ असे नाव धारण केलेल्या देवेंद्र गाडेकर यांनी रसिकांची दाद मिळविली़ जगण्यातील वास्तवाचे दर्शन घडविणाऱ्या, आत्मभान जागविणाऱ्या गझलांच्या बहारदार सादरीकरणाने रंगलेल्या गझलरंग या दर्जेदार मराठी गझल मुशायऱ्याचा आशयघन आनंद वर्धेकरांनी अनुभवला़
सुरेश भट गझल मंच पुणे आणि द्वारका सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश हायस्कूलच्या रंगमंदिरात रंगलेल्या या मुशायऱ्याला वर्धेकारांनीही जिंदादिल दाद देत आपल्या वैदर्भीय रसिकतेचा परिचय दिला़ ‘या नभाचा सातबारा तू मला सांगू नको, कोण होता ध्रुवतारा तू मला सांगू नको’, ही आत्मभान जागविणारी गझलही रसिकांच्या ह्रदयाला भिडली़ सुरेश भट गझल रंग प्रस्तुत या मुशायऱ्यात नव्या पिढीचे गझलकार सुधीर मुळीक मुंबई, देवेंद्र गाडेकर पुणे, संजय इंगळे तिगावकर, रूपेश देशमुख वर्धा, अनंत नांदुरकर अमरावती, अमीत वाघ अकोला, सुशांत खुरसाळे जालना, किशोर मुगल चंद्रपूर यांनी एकाहून एक सरस गझल सादर करीत रसिकांची दाद मिळविली़
‘जर दुखाचे लक्षण नसते, आज इथे इतकेजण नसते, अशी भूमिका मांडत सुधीर मुळीक या युवा गझलकाराने, ‘बेपर्वा जगण्यातून मी या निष्कर्षाला आलो, पडू नये हा प्रश्न कुणाला का जन्माला आलो, फक्त तुझ्याशी करतो देवा तुलना माझी, आपण दोघे कधी कुणाच्या उपयोगाला आलो, अशी धीरगंभीर स्वरातील गझल सादर करीत दाद मिळविली़ ‘तू सोबत असते तेव्हा हे उन्हही कोमल होते, घामाचे होते अत्तर, काट्यांची मखमल होते’, अशी हळुवार भावना गझलेतून व्यक्त करतानाच संजय इंगळे तिगावकर यांनी ‘तुझी ख्यालीखुशाली ते जरी पुसती तुकारामा, कट्यारी सोवळ्या-मधल्या मला दिसती तुकारामा’ अशा शब्दातून सामाजिक वेदनाही मांडली़ सुशांत खुरसाळे या गझलकाराने ‘उजेडासही काळोखाचा भार वगैरे असतो का, आजकाल दुनियेत तुझ्या अंधार वगैरे असतो का, तुझा हात लागावा म्हणुनी मलमपट्टीचे नाटक हे माझ्या जखमांना कुठला उपचार वगैरे असतो का’, या तारूण्यसुलभ शेरांनी वातावरण रोमांचित केले़ हरवलेल्या निरागस मुलासारखा शोधतो मी जीवना तुला सारखा, अशा शब्दांतून व्यक्त होत अमीत वाघ यांच्या गझलांनी वेगळीच रंगत मैफलीत आणली़ त्यांच्या ‘बोचले नाही मला काटे दुधारी, मग फुलांनी घेतली माझी सुपारी, पाहुनी चोचीत दाणा पाखरांच्या, मान खाली घालुनी गेला शिकारी’ या शेरांना रसिकांनी दाद दिली़ अनंत नांदुरकर यांनीही ‘खरेच नाही याची पर्वा फार मला, कधी कोणती लाट कुठे नेणार मला’ अशा दर्जेदार शेरांमधून मैफल जिंकून घेतली़ रूपेश देशमुख यांनी ‘वरून सारे छान चालते, आतून कारस्थान चालते’ अशा शब्दात दुटप्पी मानसिकतेवर प्रहार केले तर ‘चिमण्या आता हुशार झाल्या, घरात घरटे बांधत नाही’ हे जागतिकीकरणाच्या युगातील सत्य मांडत किशोर मुगल यांनी ‘रक्त पाजले तरीही म्हणतो मनासारखे स्वागत नाही, एक समुद्र आटू शकतो, डोळा कधीच आटत नाही’ अशा भावना आपल्या गझलेतून व्यक्त केल्या़ मुशायऱ्याला सिंधूताई सपकाळ, सिनेदिग्दर्शक राजदत्त, आ़डॉ़ पंकज भोयर, डॉ़ रमेश भामकर उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: 'Swaminathan's statement comes from father's house, then life is bread.'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.