लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहरासह परिसरातील तब्बल २० गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविणाऱ्या धाम नदीच्या पुनर्जीवन अंतर्गत येळाकेळी येथील पिकअप वेअरपासून ते काचनूर या सुमारे २६ किमीच्या धाम नदीतून वनस्पतीसह गाळ काढण्याचे काम जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे.पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी येळाकेळी शिवारात या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. पण सुमारे १८ हजार घनमीटर गाळ काढल्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने तसेच अजूनही थांबून थांबून पाऊस सुरू असल्याने ‘स्वच्छ धाम’ या उपक्रमाला सध्या ब्रेक लागला आहे. पावसाने विश्रांती घेतल्यावर पुन्हा एकदा नव्या जोमाने गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.
जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे सहकार्य मोलाचे- धाम नदी गाळमुक्त व्हावी यासाठी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने मोलाचे सहकार्यच जिल्हा प्रशासनाला केले आहे. या संस्थेने आपल्या सीएसआर निधीतून सुमारे चार लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु, थांबून थांबून होणाऱ्या पावसामुळे प्रत्यक्ष कामाला ब्रेक लागला आहे.
येळाकेळीचा बंधारा झाला गाळमुक्त- पावसाळ्यापूर्वी येळाकेळी येथील धाम नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला. त्यामुळे सध्या येळाकेळी येथील धाम नदीवरील बंधारा गाळमुक्त झाला आहे. येळाकेळीच्या धाम नदीपात्रातून काढण्यात आलेला गाळ काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात टाकल्याचेही सांगण्यात आले.पाटबंधारे विभागाने मिळवून दिली एनओसी - धाम नदीपात्रातील गाळ वेळीच निघावा या हेतूने प्रत्यक्ष काम होत असल्याचे लक्षात येताच वर्धा पाटबंधारे विभागाने शासनाच्या विविध विभागांकडे पाठपुरावा करून त्या त्या विभागाची एनओसी मिळवून दिली आहे. एकूणच वर्धा पाटबंधारे विभागाच्या सहकार्यानेच धाम स्वच्छ होत आहे.