आरोग्य सेवेच्या व्रती सुशीला नायर
By Admin | Updated: December 26, 2015 02:16 IST2015-12-26T02:16:44+5:302015-12-26T02:16:44+5:30
महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाची आणि आदर्शाची मशाल सतत तेवत ठेवण्याचे काम डॉ. सुशीला नायर यांनी केले.

आरोग्य सेवेच्या व्रती सुशीला नायर
१०१ वी जयंती : बहुआयामी व्यक्तिमत्व
दिलीप चव्हाण सेवाग्राम
महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाची आणि आदर्शाची मशाल सतत तेवत ठेवण्याचे काम डॉ. सुशीला नायर यांनी केले. स्वातंत्र्यपूर्वीचे आरोग्य सेवेचे व्रत स्वातंत्र्यनंतर अधिक जोमाने करून बापूंनी सोपविलेली जबाबदारी त्यांनी कस्तुरबा दवाखाना व महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या रूपाने पूर्ण केली. त्या उत्तम डॉक्टर तर होत्या, सोबतच स्वातंत्र्य सेनानी, समाजसेवी, सहित्यिक, वक्ता, चित्रकार असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. आरोग्य सेवेच्या व्रती म्हणूनच त्यांचे जीवन समर्पित राहिले. २६ डिसेंबरला त्यांची १०१ वी जयंती साजरी होत आहे.
डॉ. सुशीला नायर यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ साली गुजरात (पंजाब) जिल्ह्यातील कंजा गावात झाला. हे गाव आता पाकिस्तानमध्ये आहे. शीख परिवारातील असल्या तरी म. गांधींच्या प्रेरणादायी सानिध्यात राहण्याचे भाग्य त्यांचे मोठे बंधु प्यारेलालजींमुळे लाभले. भावाप्रमाणे आपले जीवनही बापू समर्पित करण्याचा निर्धार करून सामाजिक बदल, रचनात्मक कार्यक्रम व आरोग्य सेवेसाठी स्वत:ला झोकून दिले.
साबरमती आश्रम सोडल्यानंतर बापू सेवाग्रामला आले. आश्रम स्थापन झाल्यानंतर डॉ. सुशीला नायर आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आश्रमात आल्या. ग्रामोन्नती व स्वातंत्र्य चळवळीचे कार्य जोमाने सुरू झाले. प्यारेलालजी कार्यालयाची जबाबदारी सांभाळत. बापूंनी आरोग्य सेवेचे काम डॉ. सुशीला (बहणजी) यांच्यावर सोपविले. यासाठी स्वतंत्र व्यवस्था म्हणून जमनालाल बजाज (आखरी निवास) यांचे निवास स्थान देण्यात आले. कार्यकर्ता तसेच ग्रामस्थांवर त्या उपचार करू लागल्या. चव्हाण परिवाराच्या वाड्यात प्रार्थना, कताई व आरोग्य सेवेचे काम केले. १९४२ ला भारत छोडो ठराव झाला. या आंदोलनात बापूंसोबत त्या मुंबईला गेल्या. सर्वांना अटक करून पुण्याच्या आगाखॉ पॅलेसमध्ये ठेवले. २१ महिने बापूंची आरोग्य सेवा व सचिवाचे काम सांभाळले. बहणजींनी वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग ग्रामीण लोकांसाठीच नव्हे तर देशाच्या सामाजिक आरोग्यासाठीही झाला.
बहणजींनी संस्थेत खादी व प्रार्थना अनिवार्य केली. डॉक्टर झाल्यानंतर ग्रामस्थांना सेवा देण्यास कुणी तयार नव्हते. यासाठी त्यांनी स्रानोकोत्तर प्रवेशास ग्रामीण भागात दोन वर्षांची सेवा अनिवार्य केली. यातून ग्रामीण भागाशी वैद्यकांचा संपर्क वाढला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशपूर्व परीक्षेत गांधी व विचारांची परीक्षा आवश्यक केली.