रोजगारासाठी सुरगावच्या महिलांची पंचायत समितीवर धडक
By Admin | Updated: July 5, 2014 23:44 IST2014-07-05T23:44:00+5:302014-07-05T23:44:00+5:30
पावसाचे अद्यापही आगमन झाले नाही़ यामुळे शेतातील कामे नाहीत़ मनरेगांतर्गत शासनाने कामे द्यावीत, या मागणीसाठी सुरगावच्या महिला व पुरूषांनी पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली़

रोजगारासाठी सुरगावच्या महिलांची पंचायत समितीवर धडक
सेलू : पावसाचे अद्यापही आगमन झाले नाही़ यामुळे शेतातील कामे नाहीत़ मनरेगांतर्गत शासनाने कामे द्यावीत, या मागणीसाठी सुरगावच्या महिला व पुरूषांनी पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली़
कोरड्या दुष्काळाचे सेलू तालुक्यात सावट असून तीन महिन्यांपासून मजुरांना कोणताही रोजगार नाही़ यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे़ एकीकडे मागेल त्याला काम देण्याचा निर्धार असलेल्या मनरेगा योजनेत काम मागण्यासाठी सुरगावच्या मजुरांवर पंचायत समिती कार्यालयात येण्याची वेळ आली़ शनिवारी सुमारे ५० ते ६० मजूर महिला व पुरूषांनी रोजगार देण्याच्या मागणीचे निवेदन पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले़
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आल्यात़
तालुक्यात नरेगा अंतर्गत ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, पाटबंधारे व कृषी विभागांतर्गत मजुरांना कामे देता येतात; पण कुठेही काम कसे नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ ग्रामसचिवांचे काम बंद आंदोलन सुरू आहे़ बुधवारपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील मजुरांना काम मिळत् नसल्याचे दिसून येत आहे़ या आंदोलनामुळे सुरगावच्या मजुरांना पंचायत समितीकडे काम मागावे लागत आहे़ आता पंचायत समितीकडून यावर काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़(वार्ताहर)