केंद्रीय पथकाने केली दुष्काळ भागाची पाहणी
By Admin | Updated: June 4, 2016 01:54 IST2016-06-04T01:54:00+5:302016-06-04T01:54:00+5:30
२०१५ मधील खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

केंद्रीय पथकाने केली दुष्काळ भागाची पाहणी
जाम गावातील शेतकऱ्यांनी मांडली आपली कैफियत
वर्धा : २०१५ मधील खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना केंद्रशासनामार्फत मदत मिळावी यासाठी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आलो असल्याचे केंद्रशासनाच्या निती आयोगाचे अधिकारी डॉ. रामानंद यांनी समुद्रपूर तालुक्यातील जाम येथे शेतकऱ्यांशी चर्चा करताना सांगितले.
समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील ग्रामपंचायत सभागृहात केंद्र शासनाच्या दुष्काळ पाहणी पथकातील सदस्य असलेले निती आयोगाचे अधिकारी डॉ. रामानंद, केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे अवर सचिव रामा वर्मा, जलसंसाधन विभागाचे उपसंचालक मिलिंद पानपाटील, ए.जी. एम.एफ. सी.आय. मुंबईचे एम.एम. बोराडे, डायरेक्टर सेट्रल इलेक्ट्रीसिटीचे जे.के. राठोड यांनी जाम गावातील शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांना त्यांनी गावात पिण्याचे पाणी आहे का? मागच्या वर्षी किती टक्के उत्पादन झाले, पीक पेरणी व इतर खर्च आणि उत्पादन किती झाले, आणेवारी ५० टक्केच्या आत आहे का याबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी डॉ. रामानंद यांनी जाम येथील शेतकरी अमोल जांभळीकर यांच्याकडून मागच्या वर्षी झालेल्या उत्पादनाबाबतची माहिती जाणून घेतली. यावेळी जांभळीकर यांनी सांगितले की, माझ्याकडे दहा एकर शेती आहे. २०१५ मध्ये खरीप हंगामात मी कापूस, सोयाबीन व तुरीचा पेरा केला होता. त्यासाठी पाच लाख रूपये खर्च केले. पण उत्पन्न दोन लाखही आलेले नाही. त्यामुळे शेतकरी खुप अडचणीत आहे. अवधूत सोमल, अजय पिटे या शेतकऱ्यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी पथकातील पाचही सदस्यांनी जाम गावातील शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. केंद्र शासनाच्या कृषी विभागांच्या योजनांचा आपल्याला लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
काही शेतकऱ्यांनी कैफियत मांडतांना सांगितले की, खरीप हंगाम गेल्यावर रब्बी हंगाम चांगला होईल या आशेवर शेतकऱ्यांनी रब्बीचा पेरा केला. पण हातातोंडाशी घास आला असताना अचानक गारपीट आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील शेतकरी हवालदील झालेला असून त्याला शासकीय मदतीची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचे शेतकऱ्यांनी पथकाला सांगितले.
काही शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवारांची कामे या परिसरात सुरू करण्याची मागणी केली. तसेच पिकांचे नीलगायीपासून नुकसान होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणीही त्यांनी पथकाकडे केली. या पथकासोबत अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलवडे, समुद्रपूरचे तहसीलदार सचिन यादव, हिंगणघाटचे तहसीलदार दीपक कारंडे, कृषी सहसंचालक विजय घावडे, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. भारती आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)