सुरगावच्या रंगाविना धुलिवंदनाची क्रेझ कायमच
By Admin | Updated: March 6, 2015 01:56 IST2015-03-06T01:54:27+5:302015-03-06T01:56:18+5:30
वृक्षांची होणारी कत्तल, रासायनिक रंगांमुळे होणारे दुष्परिणाम, यापासून बचावाकरिता सारेच प्रयत्नरत आहेत. याकरिता सेलू तालुक्यातील सूरगाव येथील रंगाविना होळी आदर्श ठरत आहे.

सुरगावच्या रंगाविना धुलिवंदनाची क्रेझ कायमच
प्रफुल्ल लुंगे सेलू
वृक्षांची होणारी कत्तल, रासायनिक रंगांमुळे होणारे दुष्परिणाम, यापासून बचावाकरिता सारेच प्रयत्नरत आहेत. याकरिता सेलू तालुक्यातील सूरगाव येथील रंगाविना होळी आदर्श ठरत आहे. कधी एका गावात सुरू झालेली ही परंपरा आज जिल्हाभर सुरू झाली आहे. राष्ट्रसंतांच्या विचाराने प्रेरीत झालेल्यांकडून धुनिवंदनाच्या (शुक्रवारी) दिवशी सकाळी प्रभातफेरीसह दिवसभर विविध कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहे.
सुमारे अडीच हजार लोकसंख्या असलेल्या सूरगावातून या रंगाविना होळीची कल्पना अस्तित्त्वात आली. अठरा वर्षांपूर्वी सुरू झालेली ही परंपरा आजही कायम आहे. महाराष्ट्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने भारावलेल्या व ग्रामगीता आपले जीवन मुल्य मानणाऱ्या सूरगाव येथील गुरूदेव विचारकांचा हा आनंदोत्सव पाहण्यासाठी धुळवडीच्या दिवशी दूरदूरून लोक येतात.
गत १८ वर्षांपूर्वी राष्ट्रसंताच्या कार्याने व विचाराने प्रेरीत झालेले सप्तखंजेरीवादक व समाज प्रबोधनकार तसेच सच्चा गुरूदेवप्रेमी प्रवीण महाराज देशमुख या युवकाने पुढाकार घेवून राष्ट्रसंताच्या विचाराचे रोपटे सूरगावात रोवले. सतविचाराने या रोपट्याने बाळसच पकडले असं नाही तर आज त्या विचारांचा वटवृक्ष झाला.
धुलिवंदनाच्या तीन दिवसाआधीपासून विविध समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमांसह नामधून, योगासने, सामान्य ज्ञान स्पर्धा, सामूदायिक प्रार्थना, शेतकरी मेळावा, सर्वधर्म समन्वय संमेलन आदी कार्यक्रम उत्साहात होतात. धुलिवंदनाच्या दिवशी मुख्य कार्यक्रम होतो. गावात लहानग्यांपासून थोरापर्यंत कोणीही रंग खेळत नाही. गावात चिमुकल्या मुलापासून तर वृध्दापर्यंत महिला पुरुष सर्वच राष्ट्रसंतांच्या विचाराच्या धुळवडीत न्हावून निघतात. गावात लाकूड तोडून होळी पेटत नाही, तर दररोजच्या साफसफाईतून गोळा होणाऱ्या कचऱ्याची होळी पेटविली जाते.
धुळवडीच्या दिवशी भल्या पहाटेपासून गावातून नामधून निघते. बाहेर गावावरून आलेले पाहुणेही नामधूनचा आनंद घेतात. गाव दिवाळीसारखे सजविल्या जाते. प्रत्येक घरासमोर संताचे फोटो सजविलेल्या आसनावर ठेवल्या जाते. साडासार्वन करून रांगोळी घातल्या जाते.