शाळेतील गोळ्यांनी विद्यार्थी आजारी
By Admin | Updated: January 27, 2015 23:37 IST2015-01-27T23:37:10+5:302015-01-27T23:37:10+5:30
वायगाव (नि.) येथील ठाकरे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत दिलेल्या गोळ्यांमुळे विद्यार्थ्याची प्रकृती खालावली़ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केल्याने विद्यार्थी बचावला़ या घटनेमुळे

शाळेतील गोळ्यांनी विद्यार्थी आजारी
वर्धा : वायगाव (नि.) येथील ठाकरे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत दिलेल्या गोळ्यांमुळे विद्यार्थ्याची प्रकृती खालावली़ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केल्याने विद्यार्थी बचावला़ या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली़ यापूर्वीही या आश्रम शाळेत असे प्रकार घडल्याने सुरक्षितता धोक्यात आल्याचे बोलले जात आहे़
प्रजासत्ताक दिनी इयत्ता सातवीचा विद्यार्थी अभय अंकुश आत्राम हा आजारी झाला़ यामुळे त्याला शाळेतीलच गोळ्या देण्यात आल्या़ या गोळ्यांनी त्या विद्यार्थ्याची प्रकृती सुधारण्याऐवजी गंभीर झाली़ डोळे पांढरे करून त्याने झटके देण्यास सुरूवात केली़ यामुळे घाबरलेल्या शिक्षकांनी त्याच्या आई-वडिलांना सूचना दिली़ अंकूश आत्राम व त्यांच्या पत्नी डौलापूर येथून ३.३० वाजता शाळेत दाखल झाले़ यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले़ अभयची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरही घाबरले होते़ शर्थीचे प्रयत्न करून डॉक्टरांनी विद्यार्थ्याला वाचविले़
या घटनेबाबत वायगाव (नि.) येथील संबंधितांना माहिती दिली. यावरून मुख्याध्यापक रामदास डुकरे व शिक्षक रंगारी यांनी अंकूश आत्राम त्यांना शिवीगाळ केल्याचेही त्यांनी सांगितले़ मुख्याध्यापक व शिक्षक विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नाही़ यामुळे असे प्रकार नेहमीच घडत असल्याचे पालकांनी सांगितले़ काही दिवसांपूर्वी इयत्ता चवथीचा विद्यार्थी शुभम कोकाटे याची प्रकृती खराब झाली होती. त्याला सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहे. शुभमची प्रकृती कशाने बिघडली, हे कळू शकले नाही़ मुख्याध्यापक डुकरे यांना विचारणा केली असता त्यांना बोलणे टाळले़(तालुका प्रतिनिधी)