विद्यार्थ्यांना राहावे लागते उपाशी
By Admin | Updated: January 28, 2015 23:37 IST2015-01-28T23:37:16+5:302015-01-28T23:37:16+5:30
येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अन्न पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून मानकानुसार जेवण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना उपाशी राहावे लागत आहे. असा आरोप करून वसतिगृहात

विद्यार्थ्यांना राहावे लागते उपाशी
मागासवर्गीय वसातिगृहात समस्यांचा अंबार : समाजकल्याण कार्यालयात आंदोलन
वर्धा: येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अन्न पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून मानकानुसार जेवण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना उपाशी राहावे लागत आहे. असा आरोप करून वसतिगृहात अन्नपुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला बदलविण्याची मागणी येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. याकडे समाजकल्याण विभागाने दुर्लक्ष केल्याने बुधवारी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी आंदोलन केले. समाजकल्याण सहायक आयुक्त आंदोलनस्थळापासून गेले मात्र त्यांनी यावर कुठलीही चर्चा केली नाही. सायंकाळपर्यंत विद्यार्थी तिथेच बसून होते.
शैक्षणिक वर्ष २०१४-१५ च्या सुरुवातीपासून भोजन पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून होत असलेल्या अनागोंदीच्या अनेक तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. या विषयाबाबत अनेकदा वसतिगृह गृहपाल व समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केली. कायमस्वरुपी तोडगा निघाला नसल्याने विद्यार्थ्यांना पुरवठाधारकाकडून वारंवार त्रासाला व अनियमिततेला सामोरे जावे लागत आहे.
१५ आॅगस्ट २०१४ व त्यानंतर नोव्हेंबर २०१४ मध्येही भोजन पुरवठाधारक बदलविण्याबाबत विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. यावेळी समाजकल्याण विभागाकडून मिळालेल्या आश्वासनाच्या आधारावर विद्यार्थ्यांनी त्यांची मागणी परत घेतली होती. या आश्वासनावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांना वेळेवर नाश्ता मिळत नाही, फळांचा नियमित पुरवठा होत नाही. शिवाय मानकानुसार सकाळी दूध देणे गरजेचे असताना तेही मिळत नाही. विद्यार्थ्यांच्या तुलनेत दूध कमी येत आहे. त्यात वाढ करण्याची मागणी केली असता दुधात पाणी टाकूण देण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. शिवाय भोजन पुरवठाधारक विद्यार्थ्यांच्या हातून ताट हिसकावून घेत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे.
जेवणासाठी वापरल्या जाणारे खाद्य तेल, आटा, दाळ, तांदुळ यांचा दर्जा निकृष्ट असल्याचाही आरोप आहे. यात विद्यार्थ्यांना काही मागणी केल्यास मद्यधुंद अवस्थेत वसतिगृहात येवून विद्यार्थ्यांना शिवीगाळ करीत असल्याचेही विद्यार्थ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याकरिता जोपर्यंत समाजकल्याण सहायक आयुक्त येत नाही तोपर्यंत येथून आम्ही हलणार नाही, अशी भूमिका अमित दिवे, विकेश तिमांडे, गिरीधर चंदनखेडे, सुदर्शन भगत, निलेश मेश्राम, पवन घंगाळे, रोशन खडसे, सुरज वानखेडे यांच्यासह विद्यार्थ्यांनी घेतली.(प्रतिनिधी)